मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत विधिमंडळ गटनेते म्हणून जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे. तर दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे चिरंजीव, युवा आमदार रोहित पाटील मुख्य प्रतोद, ज्येष्ठ नेते उत्तम जानकर यांच्याकडे प्रतोदपदाची जबाबदारी देण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाची आज (1 डिसेंबर) मुंबईत बैठक पार पडली.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दुपारी ५ वाजेनंतर ८ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. मतदान झाल्यानंतर जर एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान वाढत असेल तर धक्कादायक बाब आहे, अशी प्रमुख चिंता आजच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. म्हणूनच निवडणुका बॅलेटवर व्हाव्यात अशी आमची मागणी आहे. बाबा आढाव यांनी सुरू केलेले आंदोलन राज्यभर राबविले गेले पाहिजे, असेही पाटील यांनी सांगितले. आज झालेल्या बैठकीत विधिमंडळातील 10 पैकी 9 सदस्य उपस्थित होते. दहावे संदीप क्षीरसागर असून त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या सत्कार कार्यक्रम असल्याने अनुपस्थित राहण्याची त्यांना परवानगी देण्यात आली होती. मात्र, ते उद्या येऊन आज मांडलेल्या प्रस्तावाला पाठिंबा देतील. तसेच, आमचे संख्याबळ कमी असले तरी जनतेचे प्रश्न मांडण्याची ताकद आमच्या नेत्यांमध्ये आहे. गटनेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडू, अशी माहिती पाटील यांनी दिली.