मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून राज्यपाल बैस यांना निरोप; नौदलातर्फे मानवंदना

0

मुंबई – आपला कार्यकाळ पूर्ण करीत असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांना आज (३० जुलै) महाराष्ट्र शासनातर्फे राजभवन येथे भावपूर्ण न‍िरोप देण्यात आला. राज्यपालांच्या कक्षात झालेल्या एका छोटेखानी सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल बैस व त्यांच्या पत्नी रामबाई बैस यांचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार केला.

आपल्या कार्यकाळात आपणाला राज्य शासनाकडून उत्तम सहकार्य मिळाल्याबद्दल राज्यपालांनी सर्वांचे आभार मानले. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी देखील राज्यपालांचे वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

पालकमंत्री दीपक केसरकर, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त मुख्य सचिव राजशिष्टाचार मनिषा म्हैसकर व इतर वरिष्ठ अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राज्यपालांना राज्यातील गडकिल्ल्यांची माहिती असलेले पुस्तक भेट दिले. निरोप सोहळ्यानंतर भारतीय नौदलातर्फे राज्यपालांना मानवंदना देण्यात आली. राज्यपाल बैस यांनी त्यानंतर रायपुरकडे प्रस्थान केले.

 

नव्या राज्यपालांचा शपथविधी ३१ रोजी
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्त झालेले राज्याचे नवे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा शपथविधी दरबार हॉल राजभवन मुंबई येथे बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी संध्याकाळी 6. 30 वाजता होणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech