मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये महिनाभरापासून बैठकांचे सत्र सुरू होते. पण जागावाटपाचा तिढा सुटता सुटत नव्हता. काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचा काही जागांवर दावा होता. त्यामुळे चर्चेतून तिढा सोडवला जात होता. यात बहुतांश जागांचा तिढा सुटलेला आहे. परंतु ३ जागांवरून अजूनही दावे-प्रतिदावे सुरूच आहेत. यामध्ये दक्षिण मुंबई, सांगली आणि भिवंडी या तीन जागांचा समावेश आहे. यावरून वरिष्ठांमध्ये संवाद सुरू आहे. परंतु अद्याप यावर तोडगा निघू शकला नसल्याचे समजते. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही परिस्थितीत सोबत घेण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. त्यामुळे आता त्यांना ४ ऐवजी ५ जागांचा प्रस्ताव पाठविल्याचेही समजते.
एकीकडे महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा आता थोडक्यात अडकला आहे. परंतु त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची महाविकास आघाडीची भूमिका आहे. त्यामुळे अॅड. प्रकाश आंबेडकर यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यातच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायला आम्ही तयार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने याबाबत विचार करावा, असे म्हणून पटोले यांनी हा चेंडू थेट राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कोर्टात टाकला. त्यामुळे नव्याने प्रस्ताव देण्याचा विचार पुढे आला. त्यातून महाविकास आघाडीकडून वंचितला कालपर्यंत ४ जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. पण वंचितमुळे लोकसभा निवडणुकीत संभाव्य धोका लक्षात घेऊन वंचितला आता ५ जागांचा प्रस्ताव समोर आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.