रत्नागिरी – जिल्हा नियोजन समितीमधून लांजा तालुक्यातील पहिल्या टप्प्यात ३४ ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० लाख असे ३ कोटी ४० लाख आणि लांजा शहरासाठी ५ कोटीचा निधी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
लांजा येथील संकल्पसिद्धी सभागृहात जनता दरबार घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. लांजा तालुक्यातील साठही ग्रामपंचायतींना प्रत्येकी दहा लाखांचा निधी दिला जाईल. पहिल्या टप्प्यात ३४ ग्रामपंचायतींना आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ग्रामपंचायतींना निधी दिला जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी सर्वसामान्य जनतेने दिलेल्या निवेदनावर पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, बेनी नदीवरील पुलासाठी नाबार्डकडे पाठपुरावा करावा. भूमिअभिलेखने मोजणी करून हद्द ठरवून देण्याचा विषय तहसीलदारांनी मार्गी लावावा. नगर पंचायत मुख्याधिकाऱ्यांनी गणेशोत्सवाआधी रस्त्यांवरील खड्डे भरून घ्यावेत. प्रांतांनी भूसंपादनाचे अडकलेले पैसे देण्याची कार्यवाही आठ दिवसांत करावी. रिक्त पदांवर डीएड, बीएड भरतीसंदर्भात शालेय शिक्षणमंत्र्यांसोबत बैठक लावून पाठपुरावा केला जाईल. त्याबाबत धोरणात्मक निर्णयाबाबत प्रयत्न करू, असे पालकमंत्री म्हणाले.
तायक्वांदो क्रीडाप्रकाराच्या सरावासाठी आवश्यक असणाऱ्या ५० मॅट दिल्या जातील. कबड्डीसाठीही मॅट दिले जातील. त्याची मागणी नगरपंचायतीने करावी. वनगुळे बौद्धवाडी येथील संरक्षक भिंत बांधण्याचा प्रस्ताव समाजकल्याकडे पाठविला जाईल. ग्रामीण रुग्णालयाचे स्थलांतर लवकरात लवकर करावे, त्याबरोबर डॉ. नाफडे यांच्याकडे सोनोग्राफीची सोय करण्यात येत आहे. गोंडेसखल येथील शाळेला संरक्षक भिंत बांधण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालावे आणि काम पूर्ण करावे. ज्या गावात जायला रस्त्याची अडवणूक केली जाते, अशा प्रकरणांमध्ये प्रांताधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून जागा अधिग्रहित करावी, अशी सूचना पालकमंत्री श्री. सामंत यांनी दिली.
सर्वसामान्य जनेतेची व्यवस्था करताना कोणताही पक्षपातीपणा करायचा नाही, असे सांगून पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, भविष्यात घनकचऱ्याचा जटील प्रश्न निर्माण होणार आहे. सर्वांनी एकत्र बसून त्यावर मार्ग काढला पाहिजे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जेथे विजेचे खांब बदलणे आवश्यक आहे, ते तातडीने बदलावेत. अधीक्षक अभियंत्यांनी तालुक्यातील सरपंचांसोबत बैठक घ्यावी आणि १७२ कोटींच्या कामांचे सादरीकरण सरपंचांना करावे. मंदिर, ग्रामपंचायत, नळपाणी पुरवठा योजना, शाळा आणि धार्मिक स्थळे यांच्या थकीत वीज बिलापोटी वीज तोडण्यापूर्वी प्रथम थेट माझ्याशी चर्चा करावी, असेही पालकमंत्री म्हणाले.
उपस्थितांची निवेदने पालकमंत्री श्री. सामंत यांनी स्वीकारून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी नगराध्यक्ष मनोहर बाईत, प्रांताधिकारी वैशाली माने, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे आदी उपस्थित होते.