नवी दिल्ली : जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ आणि भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर आज, शनिवारी दिल्लीच्या निगम बोध घाटावर दुपारी 1 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका वाड्रा यांच्यासह दिग्गज नेते डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यविधीला उपस्थित होते. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री मनीष गोबिन हे देखील मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. डॉ. सिंग यांचे गुरुवारी रात्री एम्स रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी ते 92 वर्षांचे होते. डॉ. सिंग आणि त्यांच्या पत्नी श्रीमती गुरशरण कौर यांना तीन मुली आहेत.डॉ. सिंग यांचे पार्थिव सकाळी 9.30 वाजता दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात नेण्यात आले. त्यानंतर काँग्रेस मुख्यालयापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर निगम बोध घाटावर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, विचारवंत आणि अभ्यासक म्हणून प्रसिद्ध होते. सदैव नम्र, विनयशील, कठोर परिश्रम आणि कामाप्रती बांधिलकी ही डॉ. मनमोहन सिंग यांची स्वभाव वैशिष्ट्ये होती.
डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अविभाजित भारतातील पंजाब प्रांतातील एका गावात झाला. डॉ. सिंग यांनी 1948 साली पंजाब विद्यापीठातून मॅट्रिक पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठातून घेतले. 1957 मध्ये त्यांनी अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यानंतर 1962 मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी मिळवली. डॉ. सिंग यांनी पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक म्हणूनही काम केले. दरम्यान, त्यांनी काही वर्षे संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेच्या सचिवालयातही काम केले. पुढे 1987 आणि 1990 मध्ये जीनिव्हा येथील दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. 1971 मध्ये डॉ. सिंग वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले. 1972 मध्ये त्यांची अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. डॉ. सिंग यांनी 1991 ते 1996 या काळात भारताचे अर्थमंत्री म्हणून काम केले, हा स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातील एक निर्णायक काळ होता. आर्थिक सुधारणांसाठी सर्वसमावेशक धोरण ठरवण्याच्या त्यांच्या भूमिकेचे सर्वांनी कौतुक केले.
डॉ. मनमोहन सिंग त्यांच्या राजकीय कारकिर्दीत 1991 पासून एप्रिल 2024 पर्यंत राज्यसभेवर होते. दीर्घकाळ भारतीय राजकारणात विविध महत्त्वाच्या पदांवर राहिलेले डॉ. मनमोहन सिंग कधीही लोकसभेचे सदस्य नव्हते. मनमोहन सिंग 1999 ते 2004 या काळात राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. 2004 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस प्रणीत संपुआला (यूपीए) बहुमत मिळाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मे 2009 मध्ये झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्येही पुन्हा एकदा यूपीएला बहुमत मिळाले आणि ते दुसर्यांदा पंतप्रधान बनले
होते.