कल्याण : केवळ ठाणे जिल्हा, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात सुप्रसिद्ध असणाऱ्या मुरबाडच्या म्हसा गावातील श्री खांबलिगेश्र्वर यात्रेला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कल्याण पश्चिमेतील भाजपा नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनीही आज आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह या यात्रेला भेट दिली आणि श्री श्री खांबलिगेश्र्वराचे मनोभावे दर्शन घेतले.
कल्याणजवळील मुरबाड तालुक्यात असणारे एक छोटेसे गाव म्हसा. इथल्या श्री श्री खांबलिगेश्र्वराच्या म्हणजेच श्रीशंकराच्या मंदिराची आणि त्यासाठी साजऱ्या केलेल्या जाणाऱ्या जत्रेची ख्याती सर्वदूर पसरली आहे. इंग्रजांच्या काळापासून किंवा त्यापूर्वीपासून याठिकाणी ही यात्रेची परंपरा आहे. श्री श्री खांबलिगेश्र्वर हे एक जागृत देवस्थान म्हणून त्याची सर्वत्र ख्याती आहे. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यासह देशाच्या विविध भागातून हजारो भाविक याठिकाणी यात्रेला येत असतात.
कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनीही गेल्या काही वर्षांपासून या यात्रेला येण्याचा आणि इथल्या श्री श्री खांबलिगेश्र्वराचे दर्शन घेण्याचा आपला पायंडा कायम ठेवला आहे. यंदा तर पवार हे आपल्या शेकडो कार्यकर्ते – समर्थकांच्या साक्षीने या यात्रेला उपस्थित राहिल्याचे दिसून आले.
आपल्या हातून आतापर्यंत ज्याप्रमाणे धार्मिक सेवेसह सामाजिक सेवा घडत आहे, ती अशीच अखंड सुरू राहो आणि अधिकाधिक लोकांच्या अडी अडचणी सोडवण्याची आपल्याला शक्ती प्राप्त होवो असे गाऱ्हाणे आपण यावेळी श्री श्री खांबलिगेश्र्वराला घातल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले.