पुणे – इंदापूर तालुक्यातील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बारामतीच्या खासदार व कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, मढाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. यावेळी सभेला संबोधित करताना, शरद पवार साहेब म्हणाले की, कृषी धोरण आणि ग्रामीण विकासासाठी सतत समर्पण केल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांचे कौतुक केले आणि हर्षवर्धन पाटील आणि त्यांचे वडील, बारामतीचे माजी खासदार शंकरराव पाटील या दोघांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकला.
पवार साहेब म्हणाले की, आम्ही वेगवेगळ्या पक्षात असू, पण जेव्हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न आला तेव्हा आम्ही नेहमीच एकत्र काम केले. कृषी सुधारणांसाठी जेव्हा जेव्हा नवीन नेतृत्वाची गरज भासली तेव्हा हर्षवर्धन पाटील यांना नेहमीच पहिली पसंती असते. हा केवळ इंदापूरचा निर्णय नाही. परंतु महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि संपूर्ण देशातील कृषी क्षेत्रासाठी असे शरद पवार साहेब म्हणाले. शरद पवार साहेब म्हणाले की, निवडणुकीत मला स्वत:ला उभं राहायचं नाही. जनतेनं मला 14 वेळा निवडून दिलं. त्यातल्या 7 वेळा इंदापूर तालुक्यातील जनतेनं मला मतं दिली. त्यामुळं आता मला स्वत:साठी काहीच मागायच नाही. मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेचं जीवन बदलायचं आहे. हे जर करायचं असेल, तर ज्यांच्याकडे कर्तृत्व, अनुभव, प्रशासन आहे अशाही लोकांची गरज आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी अशा लोकांना विधानसभेत पाठवणं हे तुमचं काम आहे आणि राज्याचं काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम आहे. असेही पवार साहेब यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागं का उभी राहिली? महाराजांना माणसं आजही का विसरु शकत नाहीत. महाराष्ट्राला लढणारा नेता पाहिजे असतो. लढणाऱ्या नेत्याच्या मागं उभं राहण्याची महाराष्ट्रातील माणसांची पद्धत असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. दिल्लीवाल्यांनी जेव्हा जेव्हा जबरदस्ती केली तेव्हा शरद पवारसाहेबांनी मराठी स्वाभिमान दाखवण्याचं काम केलं. आज देखील मागच्या काही वर्षात दिल्लीश्वर हे शरद पवारसाहेबांना नमवण्याचे आटोकाट प्रयत्न करत होते. सर्व मार्गांचा अवलंब झाला. 2019 च्या निवडणुकीच्या आधी ईडीची नोटीस आली. पवारसाहेबांना मोडल्यानंतर महाराष्ट्र मोडता येईल अशी भावना या लोकांची होती. महाराष्ट्र मोडण्याचं काम दिल्लीत बसून काही लोकं करत आहेत. म्हणून स्वाभिमानी माणसं शरद पवार साहेबांच्या मागं उभी राहिली, असं जयंत पाटील म्हणाले.
हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये त्यावेळच्या काही प्रश्नांमुळं गेले. पण, तुम्ही स्वगृही येत आहात, यापूर्वीच तुम्ही यायला हवं होतं पण आमच्याकडे गर्दी होती, आता येत आहात याचा आनंद होत आहे. बहुजनांच्या उद्धाराचं राजकारण करण्याची पवारसाहेबांची भूमिका आहे. महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचा विचार उजवा ठरला पाहिजे, ही भूमिका शरद पवार साहेब यांनी जपली आहे. कितीही हल्ले झाले तरी बहुजन समाजाच्या विकासाची पताका खांद्यावर घेऊन ते चालत आहेत, त्यामुळं शरद पवार साहेबांसोबत लोक येत असल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. आज मला अतिशय आनंद होतोय की हर्षवर्धन पाटील आमच्याकडे येत आहेत. आम्ही एकत्र अनेक वर्षं काम केलं आहे. मला पत्रकार अनेकदा विचारतात की आता तुमचं काम कसं चालेल? मी एक गोष्ट अतिशय प्रामाणिकपणे सांगू इच्छिते. मी राजकारणात आल्यावर व त्या आधीपासूनही हर्षवर्धन पाटील व आमच्या कुटुंबाचे ऋणानुबंध आहेत. ते आजचे नसून सहा दशकांचे आहेत. ते पाटील व पवार कुटुंबांनी अतिशय प्रेमाने मानले आहेत. असं सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
राजकारणात काही झालं असेल तर ठीक आहे. त्यामागे काही तेव्हाची कारणं असतात. पण आपल्या प्रत्येकात तेवढी वैचारिक प्रगल्भता आहे की जे काही विसरुया व पुढे कामाला लागूयात. कारण आपण आज सगळे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी एकत्र आलो आहोत असेही सुप्रियाताई सुळे यांनी म्हटले आहे. माझी हर्षवर्धन पाटील यांना विनंती आहे. ती मीही पाळणार आहे. आपण अनेक वर्षं एकत्र राहिलो आहोत, पुढेही एकत्र राहू. आपल्यात इतक्या वर्षांमध्ये कधीच कटुता आली नाही. पण अनेक वर्षं आपल्या कार्यकर्त्यांनी एकमेकांशी संघर्ष केला आहे. मात्र आता प्रत्येक कार्यकर्त्याचा मान-सन्मान करणं ही आपल्या दोघांचीही जबाबदारी असेल. आता इथले-तिथले, आधीचे-नंतरचे ही भाषा आपण सगळ्यांनीच बंद करूयात. जे झालं ते पाहून इतिहासात रमण्यापेक्षा आजपासून पुढे इंदापूरसाठी आपण एकत्रपणे काय करता येईल हे पाहायला हवं. माझी तु्म्हाला विनंती आहे की आमच्या लोकांना थोडंसं समजून घ्या. ते आजनंतर आपले आहेत. तुम्ही मोठे भाऊ म्हणून प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकाऱ्याला समजून घ्या. प्रेमानं तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवला, तरी त्यांना पुरेसं आहे असं सुप्रियाताई सुळे यावेळी म्हणाल्या.
ही विजयाची सभा आहे. जनतेचे आभार मानतो हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना फोडण्यात आली आणि महाराष्ट्रामध्ये कधी न दिसलेली गोष्ट ही प्रत्येकाच्या तोंडी आली. याआधी केवळ वस्तु विकत घेता येतात हे माहिती होत. मात्र आमदार आणि मंत्रीसुद्धा विकत घेता येतात हे दुर्दैवी चित्र महाराष्ट्रने पाहिलं. असे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी स्वाभिमानाची निवडणूक लढण्यासाठी विजयाची, महाराष्ट्र धर्माची तुतारी हाती घेतली आहे. ज्यांनी जखम दिली त्यांना सुट्टी नाही. तेव्हा 40 आमदार गेले म्हणून पक्ष कसा टिकणार असं वाटत असताना आता 1600 इच्छुकांनी आमदारकीसाठी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे सगळं शरद पवार साहेब यांच्या हिमतीने शक्य झालं असल्याचं देखील अमोल कोल्हे यांनी म्हंटल आहे.
खासदार सुप्रियाताई सुळे आमच्या भगिनी आहेत आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे. सुप्रियाताई सुळे चार वेळा खासदार झाल्या आहेत. आधी तीन वेळा जेव्हा त्या खासदार झाल्या, त्यावेळी त्यांच्या विजयात थोडंफार का होईना, आमचंही योगदान होतं. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग होता. असे हर्षवर्धन पाटील म्हणाले. मी या पक्षात प्रवेश करण्यापूर्वी माझी आणि जयंत पाटील यांची जेव्हा जेव्हा भेट व्हायची, आमचं भेटणं किंवा बोलणं व्हायचं. आम्ही फोनवर बोलायचो. मला काही मिळावं म्हणून पक्ष प्रवेश केला नाही. तुम्ही जी जबाबदारी द्याल ती घेऊ. मी शब्दाचा पक्का आहे. राजकारण व्यक्तिगत स्वार्थासाठी करत नाही. कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्यामुळेच आज तुतारी हातात घेतली असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.