या कारणांसाठी रवींद्र वायकर यांनी सोडली उध्दव ठाकरेंची साथ….

0

मुंबई :- शिवसेना उबाठा गटाचे जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र वायकर यांनी आज मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मनीषा वायकर आणि असंख्य शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना हातात भगवा झेंडा देत त्यांचे शिवसेनेमध्ये स्वागत केले. जोगेश्वरी मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांसाठी भरघोस निधी मिळावा आणि मतदारसंघातील नागरी समस्या मार्गी लागाव्यात यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे यावेळी सांगितले.

यावेळी वायकर यांनी आपली भूमिका मांडताना, माझ्या मतदारसंघातील आरे कॉलनीमधील रस्त्याच्या कामासाठी 178 कोटींच्या निधीची गरज आहे. तेथील नागरिक दररोज मरणयातना सहन करत आहेत मात्र आजवर त्यांना न्याय मिळालेला नाही. तसेच गोरेगाव मधील रॉयल पाम मधील पाण्याचा प्रश्न असेल तसेच विभागातील इतर विकासकामे करण्यासाठी निधीची आवश्यकता असते. निधी मिळाल्याशिवाय स्थानिक मतदारांना न्याय देता येत नाही त्यामुळे सत्ताधारी पक्षात गेल्याशिवाय त्यांचे प्रश्न सोडवणे शक्य नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व विधानसभा मतदारसंघात सम न्यायी स्वरूपात विकासनिधी मिळावा या मागणीसाठी आपण स्वतः कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता, मात्र सत्ताधारी पक्षाला नेहमी जास्त निधी मिळतो असे मला कोर्टाने सांगितले त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी पक्षासोबत आलो असल्याचे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. आपल्यावर सुरू असलेल्या ईडीच्या प्रकरणात आपण तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य केले असून त्यांचे यापुढे देखील त्यांना लागेल ते सर्व सहकार्य करण्याची तयारी असल्याचे मत व्यक्त केले.

तर मुख्यमंत्री शिंदे यांनी वायकर यांचे पक्षात स्वागत करताना, सच्चे शिवसैनिक, जोगेश्वरीचे 3 वेळा आमदार, मुंबई महानगरपालिकेचे चार वेळा स्थायी समिती सभापती असलेले रवींद्र वायकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याबद्दल शिंदे यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मतदारसंघातील प्रलंबित विषय सोडवण्यासाठी ते शिवसेनेमध्ये येत आहेत. गेल्या अडीच वर्षात राज्यात असलेल्या सरकारने त्यांचे एकही काम केले नसल्याने त्याना काम करणाऱ्या सरकारमध्ये प्रवेश करावा लागला असल्याचे शिंदे यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिका आणि विधानसभेत सत्तेत असताना मंत्री म्हणून तसेच विरोधात असतानाही पक्षाचे काम करण्याचा त्याना प्रदीर्घ अनुभव आहे. या अनुभवाचा शिवसेनेला नक्की उपयोग होईल असे त्यांनी यावेळी नमूद केले. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी मनीषा वायकर तसेच त्यांचे कुटूंबीय आणि आमचे जुने सहकारी शिवसेनेमध्ये येत आहेत याबाबत आनंद वाटत असल्याचे मत व्यक्त केले.
त्यांच्यात आणि माझ्यात गेल्या काही वर्षात काही गैरसमज होते, मात्र आज समोरासमोर बसल्यावर ते सर्व गैरसमज दूर झाले असून यापुढे एकत्र काम करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

यावेळी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर, शिवसेना प्रवक्त्या सौ. शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक कमलेश राय, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे संघटक उदय सावंत आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech