सोलापूर : फ्लाय ९१ या गोवास्थित कंपनीची २३ डिसेंबरपासून गोवा-सोलापूर व सोलापूर- मुंबई अशी विमानसेवा सुरू होणार आहे. मुंबई इतकी सोलापूरकरांना तिरुपती मार्गावर विमानाची गरज आहे. गोवा पर्यटनापेक्षा तिरुपतीची क्रेझ सोलापूरमध्ये जास्त आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोलापूरकरांना नागरी विमानसेवेचा लाभ घेता येणार आहे. आचारसंहितेचा अडसर नको म्हणून निवडणूक जाहीर होण्यापूर्वी २६ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर विमानतळाचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. मात्र, तिरुपती व अयोध्या या मार्गावर विमानसेवा सुरू होण्यासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सोलापूरहून गोव्याला जाणारांची संख्या कमी असली तरी गोव्याहून सोलापूरला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गोव्यासह कोकणात स्वामी समर्थभक्तांची संख्या जास्त आहे. विमानसेवेमुळे सोलापूरचे धार्मिक पर्यटन वाढू शकते. प्रत्यक्ष विमानसेवा मात्र २३ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. २३ डिसेंबर रोजी सकाळी ९.१० मिनिटांनी सोलापूरला पाहिले नागरी सेवा देणारे विमान गोवा येथून येणार असून त्यांनतर ते सकाळी ११.५५ वाजता मुंबईकडे उड्डाण करणार आहे. सोलापूकरांमध्ये गोव्यापेक्षा मुंबई, तिरुपती व अयोध्या या मार्गावरील विमानसेवेची जास्त गरज व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यासाठी येथील हॉटेलचालक, रिक्षा, टॅक्सी चालकांनी आदारातिथ्याचे धडे घेणे आवश्यक आहे. सोलापूरची यापूर्वीची प्रतिमा मोडून काढावी लागेल. पर्यटकांना सुरक्षित व योग्य वागणूक दिल्यास धार्मिक पर्यटकांची संख्या नक्की वाढेल.