अलिबाग : अलिबाग येथील समुद्रात आक्षी साखर भागात ‘हिरकन्या’ ही मच्छीमारी बोट सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बुडाल्याची घटना घडली. सुदैवाने बोटीवरील सर्व खलाशी बचावले असले तरी बोट बुडाल्याने तब्बल २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा बोट मालक जगदीश बामजी यांनी केला आहे. दुसऱ्या मच्छीमारी बोटीतील खलाशांनी वेळीच प्रसंगावधान राखून मदत केल्याने १५ खलाशांचा जीव वाचला आहे. जगदीश बामजी यांच्या मालकीची हिरकन्या बोट १५ खलाशांसह मासेमारीसाठी निघाली होती. हिरकन्या’मधील खलाशी हे मासेमारी करताना थकून बोटीतच झोपले होते. त्याचवेळी जोरदार वाऱ्यामुळे बोट भरकटली. त्यानंतर काही काळाने बोटीत पाणी भरू लागले. कुलाबा किल्ल्याच्या मागील बाजूस बोट अचानक बुडू लागली. ही घटना समोरून येणाऱ्या बोट चालकाच्या लक्षात येताच, त्याने आरडाओरडा करून हिरकन्यामधील खलाशांना जागे केले. त्यानंतर त्यांना बोटीत घेतले. मात्र, हिरकन्या बोट बुडाली. हिरकन्या बोट बुडाल्याचे कळताच आम्ही दुसऱ्या बोटीने घटनास्थळी पोहोचलो, असे बोट मालक जगदीश बामजी यांनी सांगितले. मत्स्यव्यवसाय विकास विभागाचे अधिकारी कर्मचारी अलिबाग किनारी पोहोचले असून ते बोटीला झालेल्या अपघाताची माहिती घेत आहेत. अथक परिश्रमानंतर स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्त बोट बाहेर काढण्यात मच्छीमारांना यश आले.