मुंबई – समाज विखुरला किंवा विभागल्या गेला की समाजाचे प्रश्न अडगळीत पडतात. समाजाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर राहाणे हि काळाची गरज असुन समाजाच्या प्रगतीसाठी एकसंघ होवून संघर्ष केला पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते सिंदेवाही तालुक्यांतील शिवणी येथे आयोजित आदिवासी समाज मेळावा व सत्कार सोहळा प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
आयोजित कार्यक्रमास सत्कारमूर्ती म्हणून गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सतिश वारजुरकर, काँग्रेस जिल्हा सचिव प्रमोद बोरीकर, प्रा. परशुराम उईके, अशोक मसराम,जनार्दन पंधरे, कृष्णाजी मसराम, काँगेस तालुका अध्यक्ष रमाकांत लोधे, माजी जिल्हा परिषद सदस्य खोजराज मरस्कोल्हे, यशवंत ताडाम, अशोक मेश्राम, पितेश येरमे, अतुल कोडापे, स्वप्निल कावळे, गणेश इरपाची, वर्षा आत्राम, वामन सिडाम, सुधाकर कोल्हे, नयना गेडाम, पौर्णिमा चौके, गीता सलामे, पुष्पा सिडाम, तसेच अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यापुढें बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, आदिवासी समाजाला आरक्षण देऊन विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम काँग्रेस ने केले. आदिवासी बांधव हा या जमिनीचा मूळ मालक असुन त्यांच्या अधिकारावर घाला घालण्याचे पाप हे सत्तेतील महायुती सरकार करीत आहे.तर बहुजनांना गुलाम बनवू पाहणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून देश लुटल्या जात असुन संपूर्ण देश कर्जात बुडाला आहे. आता निवडणुका डोळ्यापुढे ठेवून आश्वासनाच्या खैरातीतून लाडक्या बहिणी सारख्या फोल योजना राबविल्या जात आहे. एकीकडे महागाई वाढवायची आणि दुसरीकडे बहिणीला भेट म्हणून खात्यात पैसे टाकायचे अशा दिशाभूल करणाऱ्यांना धडा शिकवा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी राहून प्रतिनिधित्व करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यानंतर कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती खासदार डॉ. नामदेव कीरसान यांनी मार्गदर्शन पण बोलताना सांगितले की, देशातील सरकार आदिवासींच्या आरक्षणावर उठले आहे. सरकारला जिथून जमेल तिथून खुशाल इतर समाजाला आरक्षण द्यावे मात्र आदिवासी समाजाच्या आरक्षणावर घाला घालू नये. समाज बांधवांनी गाफील न राहता अशा प्रवृत्तीचा प्रकार विरोध करावा असे आव्हान त्यांनी यावेळी केले. तर प्रचंड महागाई आणि बेरोजगारी यावरून राज्य चिंतेत असताना खोटी आश्वासने, पोकळ योजना, ही शासनाची फसवेगिरी असल्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजुरकर म्हणाले. कार्यक्रमाच्या स्वागता प्रसंगी समाजातील युवतींनी गोंडी भाषेत गीत गायन करून मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य पंकज उईके तर प्रास्ताविकातून प्रा. परशुराम उईक यांनी समजाच्या व्यथा व प्रलंबित प्रश्न उपस्थित मंचापुढे मांडले.तर कार्यक्रमाचे आभार अशोक मेश्राम यांनी मानले. आयोजित कार्यक्रमास सिंदेवाही तालुक्यासह परिसरातील हजारोंच्या संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.