दुष्काळ पाहणी करून समिती मदतीसाठी सरकारकडे अहवाल सादर करणार
मुंबई – राज्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत असताना सरकार आणि प्रशासन मात्र स्वतःच्या वेगळ्या दुनियेत व्यस्त आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कोणतीही मदत सरकारकडून अजून मिळालेली नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी काँग्रेसने दुष्काळ संदर्भात नेमलेल्या विदर्भाच्या समितीची आज बैठक पार पडली.
विदर्भात ५ जून पासून ही समिती पाहणी दौरा करणार आहे. त्यानंतर सविस्तर अहवाल राज्य सरकार पुढे मांडून शेतकऱ्यांसाठी भरीव, ठोस अशा मदतीची मागणी करण्यात येणार आहे. या बैठकीलाआमदार विकास ठाकरे,आमदार रणजित कांबळे,आमदार सहसराम कोरोटे, आमदार अभिजित वंजारी,आमदार सुधाकर आडबाले, समन्वयक अतुल कोटेचा उपस्थित होते.
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कृषी मंत्री बाहेर आहेत, ते बाहेर असताना आयुक्तांची बदली होते.पूर्णवेळ सचिव नाही. खरीप हंगाम तोंडावर असताना बैठक होत नाही. खतांचा तुडवडा आहे, बियाणाचे दर वाढले, बियाण्यांसाठी लोक रांगेत उभे आहेत. या सर्व परिस्थितीवर उपाययोजना करण्याऐवजी सत्ताधारी परदेशात मजा मारत आहेत, अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारचे वाभाडे काढले आहेत.
शेतकरी जगला काय आणि मेला काय या सरकारला काय फरक पडतो ? राज्यातील शेतकऱ्यांप्रती महायुती सरकारची अनास्था यामधून दिसत आहे. दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्याऐवजी सत्ताधारी गायब आहेत. विदर्भातील शेतकऱ्यांना कोणतीही मदत सरकारकडून मिळत नसून अनास्था असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.