नालासोपारा : मुंबई जवळील नालासोपाऱ्यात एका घरामध्ये बॉडी स्प्रेचा भीषण स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या स्फोटात एकाच कुटुंबातील चार जण होरपळून जखमी झाले आहेत. त्यांच्यावर स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपाराच्या आचोळा येथील संकेश्वर नगरमधील रोशनी अपार्टमेंटच्या रूम नंबर ११२ मध्ये सुगंधी द्रव्याच्या (बॉडी स्प्रे) बॉटल परफ्युम भरण्याचे काम सुरू होते. त्यावेळी घरात स्फोट झाला. इमारतीत झालेल्या स्फोटात जखमींमध्ये महावीर वडर (वय ४१) हा ४३ टक्के भाजला असून त्यांची पत्नी सुनिता वडर ८० टक्के भाजली आहे. तर मुलगी हर्षदा ६४ टक्के भाजली आहे आणि ९ वर्षाचा मुलगा हर्षवर्धन वडर यांचा समावेश असून, यातील मुलगा हर्षवर्धन याची प्रकृती चिंताजनक आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्रीच्या सुमारास परफ्यूम बॉटलवरील तारखा संपल्या होत्या. त्या भंगारात देण्यासाठी खाली करण्याचे काम सुरू होते याच दरम्यान अचानकपणे परफ्युममधील ज्वालाग्रही पदार्थाचा घरात स्वयंपाक बनत असताना आगीशी संपर्क झाला आणि भीषण स्फोट झाला. या स्फोटात घरातील चार जण होरपळून जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचे प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना मुंबईच्या केएम रुग्णालयाशी संपर्क साधला जात आहे.
नालासोपारा पूर्वेच्या शंकेश्वरनगर मधील एका इमारतीत परफ्युमवरील तारखा बदलण्याचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी रात्री ९:४५ च्या सुमारास घडली आहे. या स्फोट मध्ये एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. या घटनेची माहिती पालिकेच्या अग्निशमन विभागाला मिळताच घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली. तर जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. या अपघातानंतर शेजारील नागरिकही भयभीत झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, या घटनेचा तपास केला जात असून नेमकं स्फोट होण्याचं कारण शोधण्यात येत आहे.