सिंधुदुर्ग – हिंदूंचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना ही शासन निर्मितच आहे.त्यामुळे या दुर्घटनेत शिवरायांच्या अवमानास जबाबदार असणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व ईतर अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अवमानाची जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव विनायक राऊत यांनी केली आहे.
विनायक राऊत यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात असे म्हटले आहे की,काही महिन्यांपूर्वी नौदल दिनाच्या निमित्ताने दि.०४ डिसेंबर २०२३ रोजी मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. शिवरायांचे स्मारक उभारताना ज्या प्रतीकात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता होती, त्याकडे पूर्ण डोळेझाक करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर स्वतःचा टेंबा मिरविण्यासाठी ज्या घाई गडबडीने निकृष्ट दर्जाचे काम करून शिवरायांचा पुतळा उभा केला गेला.
करोडो रुपयांची उधळपट्टी शिवरायांच्या नावावर करून ज्यांनी स्वतःची तुंबडी भरली आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी दुरवस्था झाली त्याला सर्वस्वी महाराष्ट्र राज्याचे भ्रष्टाचारी सार्वजनिक बांधकाम खाते तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण जबाबदार आहेत, त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करणे आवश्यक आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अवमानाची जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान निसर्ग निर्मित किंवा इतर कोणत्याही कारणाने झालेला नसून तो महाराष्ट्र शासन निर्मितीतच आहे. त्यामुळे सर्व संबंधित अधिकाऱ्यांबरोबरच सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर पोलीस कारवाई करा आणि जेष्ठ तज्ञ मंडळींची समिती तयार करून या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री यांना द्यावेत अशी मागणी श्री.विनायक राऊत यांनी केली असल्याची माहिती दिली आहे.