अनंत चतुर्दशीला महापालिका क्षेत्रात ८५२३ श्रीगणेश मूर्तींचे भावपूर्ण विसर्जन

0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली शहरातील विसर्जन घाटांना भेट

निरनिराळ्या स्वीकृती केंद्रांत भाविकांनी दिल्या १२३ मूर्ती, ०७ टन निर्माल्य भाविकांनी केले दान

ठाणे  – अनंत चतुर्दशीला ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर एकूण ८५२३ गणेश मूर्तींचे महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झाले. त्यात सार्वजनिक मंडळाच्या ३२१ गणेश मूर्तीही होत्या. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबविणा-या ठाणे महापालिकेच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रीम तलावांमध्ये ३९९४ तर, विशेष टाकी व्यवस्थेत ६२१ गणेश मूर्तींचे भाविकांनी विसर्जन केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात मासुंदा तलाव, कोपरी येथील विसर्जन घाट आणि पारसिक विसर्जन घाट येथे भेट देऊन तिथे पुरवण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली आणि गणेश भक्तांशी संवाद साधला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे आदी उपस्थित होते. दरम्यान, महापालिकेने तयार केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले आहेत.

भाविकांनी १२३ मूर्ती स्वीकार केंद्रात दिल्या : महापालिकेच्या विविध ठिकाणी असलेल्या गणेश मूर्ती स्वीकार केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण १२३ गणेश मूर्तींचे महापालिकेच्यावतीने विधिवत विसर्जन करण्यात आले. तसेच, फिरत्या विसर्जन केंद्रात २० मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

०७ टन निर्माल्‍य भक्‍तांनी केले दान : दीड दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनावेळी सुमारे १२ टन, सहाव्या दिवशी १३ टन निर्माल्य संकलन झाले होते. तर, अखेरच्या दिवशी ०७ टन निर्माल्य संकलित झाले.

विर्सजनाची आकडेवारी
(विर्सजन स्थळ (संख्या) – गणेश मूर्तींची संख्या)

कृत्रिम तलाव (१५) – ३९९४
खाडी विसर्जन घाट (०९) – ३७६४
विशेष टाकी व्यवस्था (४९) – ६२१
फिरती विसर्जन व्यवस्था (०६) – २०
मूर्ती स्वीकृती केंद्र (१०) – १२३
एकूण – ८५२२

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech