विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी – बाळासाहेब थोरात

0

मुंबई : भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशांचा वापर करून भाजपा आणि सत्ताधारी मते विकत घेऊन लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम करत आहेत. निवडणूक आयोगाने भाजप आणि विनोद तावडेंवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाल्यापासून सत्ताधारी पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर सत्ता आणि पैशाचा गैरवापर सुरु आहे. आदर्श आचारसंहिता आणि नियम डावलून मतदारांना पैशांचे वाटप सुरु आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत. आज भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे यांना मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ लोकांनी पकडले आहे.

या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने निवडणुका झाल्या पाहिजेत त्यासाठी निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. पण राज्यात सत्ताधारी पक्षांकडून दररोज आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या घटना घडत आहे. आज वसई विरार परिसरातील विवांता हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व माजी मंत्री विनोद तावडे हे मतदारांना पैसे वाटत असताना नागरिकांनी त्यांना रंगेहाथ पकडले. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ वृत्तवाहिन्यांवरून संपूर्ण देशाने पाहिले आहेत. घटनास्थळी पोलीस आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी उपस्थित होते. जवळपास १० लाख रुपयांची रोकड जप्तही केली आहे.

तावडे वसई विरार मध्ये काय करत होते ? निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी व पोलिसांनी त्यांना का रोखले नाही ? पैसे वाटताना रंगेहाथ पकडूनही त्यांना अटक का केली नाही ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कालच नाशिक शहरात एका हॉटेलमध्ये मोठी रक्कम सापडली होती. त्यापूर्वीही पुणे परिसरात सत्ताधारी पक्षाशी संबंधित एका गाडीतून पाच कोटी रुपयांची रक्कम सापडली होती. राज्याच्या विविध भागात दररोज मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपये मिळत आहेत पण दुर्देवाने काहीच कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी भाजप आणि विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी थोरात यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech