सातारा : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या साताऱ्यातील मूळ गावी आले आहेत. सत्ता स्थापनेच्या धावपळीतच ते गावी आल्याने अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता गावी आल्यानंतर शिंदेंची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे. प्रकृतीच्या कारणास्तव शिंदे आज बाहेर पडले नाहीत. त्यांनी घरीच आराम करणे पसंत केले. ऐन राजकीय घडामोडींच्या काळातच शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. दिल्लीत अमित शाहांसोबत झालेल्या बैठकीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थेट त्यांच्या मूळ गावी दरे येथे गेले होते. दरम्यान त्यांनी सर्व भेटीगाठी रद्द केल्या होत्या. आज त्यांना कणकण येऊन त्यांच्या शरीराचे तापमान १०५ अंश असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ते दिवसभरापासून घराबाहेर पडलेले नाहीत. दरम्यान, डॉक्टरांचे पथक मुख्यमंत्र्यांना तपासण्यासाठी आले होते. मुख्यमंत्र्यांना डॉक्टरांनी सध्या सलाईन लावण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार त्यांना घरातच सलाईन लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दिल्लीहून परतल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तडक त्यांच्या दरे या गावी गेले. त्यांचे गाव दुर्गम भागात आहेत. गावात पोहचल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला नाही. ते थेट त्यांच्या घरी गेले. शिंदे गटाचे नेते माजी मंत्री दीपक केसरकर हे शिंदे यांना भेटायला त्यांच्या दरे या गावी गेले होते. मात्र तब्येत ठीक नसल्याने केसरकर यांना बंगल्याच्या गेटवरूनच माघारी परतावे लागले. दरम्यान केसरकर मुंबईला रवाना झाले. एकनाथ शिंदे हे अचानक गावी गेल्याने माध्यमात त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू होती. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमातील चर्चेवर आम्ही लक्ष देत नाही असा उत्तर दिले. तर एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी का गेले, यावर शंभुराज देसाई यांनी भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे यांना थोडा त्रास होत असल्यामुळे आम्ही त्यांना आग्रह केला, थोडा आराम करण्यासाठी म्हणून ते तिकडे गेले आहेत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
या आधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री यांच्याकडे गृहखात होतं. तसंच यावेळी व्हावे. मात्र याच्यावर केंद्रतील नेते अमित शहा यांच्यासोबत सल्ला घेऊन एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार निर्णय घेतील, असे देसाई म्हणाले. महायुतीमध्ये मंत्री पदाच्या संख्या आणि खाते वाटपासाठी कुठलाही रस्सीखेच आणि तणाव नाही. आमचे ६३ आमदारांनी हा ठराव केलेला आहे, पण त्याचा अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना आहे. सोमवारी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या बैठक आहे. त्यांचा नेता निवडीसाठी आणि तो झाल्यानंतर सरकार विस्तार प्रक्रियेला गती मिळेल, असे त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे उद्या मुंबई परततील. कुठल्याही गोंधळात ते नाही. जे त्यांच्या पोटात ते त्यांच्या ओठात येते. एकनाथ शिंदे महायुती सोबत आहेत आणि महायुती जो निर्णय घेईल. त्यांच्याबरोबरच ते राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.