मुंबई : मा. परिवहन समिती सदस्य राजेशदादा मोरे आणि मा. नगरसेविका रुचिता राजेश मोरे यांच्या माध्यमातून प्रभागामध्ये दिवाळी निमित्त गडे किल्ले बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे यंदाचे १४ वे वर्ष होते. महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समृद्ध इतिहास आणि मराठे शाहीतील कर्तबगार मावळे, सरदार यांनी लढाई करून जिंकलेल्या स्वराज्यातील गड दुर्गांचा ऐतिहासिक विजय तमाम शिवप्रेमींना समजावा याकरिता दरवर्षी स्पर्धेचे आयोजन केले जाते.
यंदाही दिवाळीच्या सुट्टीत प्रभागातील अनेक मुलांनी आणि मंडळांनी एकत्र येत किल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या. या किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे परिक्षण प्रसिद्ध इतिहास अभ्यासक शिल्पा परब ताई आणि त्यांच्या चमूने केले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ किल्ले शिरगाव, पालघर येथे संपन्न झाला. या निमित्ताने किल्ले केळवे भुईकोट, किल्ले केळवे पाणकोट, किल्ले भवानगड या ऐतिहासिक किल्ल्यांवर जाऊन मराठ्यांच्या कामगिरीचा, कार्यकर्तृत्वाचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्राचिन शितलादेवी मंदिरात जाऊन सर्वांनी देवीचे दर्शन घेतले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना बसने मोफत नेण्यात आले होते. मुलांना या निमित्ताने ऐतिहासिक सहलीचा आनंद मिळाला. प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ, उत्कृष्ट बांधणी, अपरिचित दुर्ग आणि इको फ्रेंडली अशा विविध प्रकारात सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह, ऐतिहासिक पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.
रविवारच्या सुट्टीमुळे अनेक पर्यटक पर्यटनाला बाहेर पडल्यामुळे किल्ल्यापर्यंत पोचायला थोडी ट्रॅफिक लागली. एक एक किल्ला बघता बघता साधारण दुपार झाली. मुलांनी भवानगड किल्ल्यावर वन भोजनाचा एकत्र आनंद घेतला. त्यानंतर, किल्ले भवानगड मुलांनी जोषात सर करायला सुरुवात केली, तोपर्यंत संध्याकाळ झाली. पुढे, किल्ले शिरगाव या ठिकाणी येऊन अनेक ऐतिहासिक जागा मुलांना पाहता आल्या. येथे पारितोषिक वितरण समारंभ संध्याकाळच्या मावळतीला संपन्न झाला. हळुहळू अंधार व्हायला सुरुवात झाली होती. तरीही, सर्वच मुलं उत्साही होती. सर्व मुलांच्या चेह-यावर आनंद होता. रात्रीच्या गडद अंधारात चांदण्याच्या प्रकाशात मुलं किल्ल्यावरुन सुखरुप बाहेर पडली.
पालघर येथील पाहिलेल्या चारही किल्ल्यांचा इतिहास दुर्ग प्रेमी प्रणव यांनी शिवप्रेमींना सांगितला. तसेच, प्रणव आणि त्यांच्या चमूने लाठी काठी, दांडपट्टा, तलवारबाजी यांचे प्रात्यक्षिक दाखवले. बालशाहिर कु. सौजस मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला तर, तन्मय यांनी गारद दिली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश बोर्डे यांनी केले तर, कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ठाणे लाईव्ह, ठाणे वैभव आणि MH04 या वृत्तवाहिनींच्या प्रतिनिधींनी केले. खूप मोठ्या संख्येने शिवप्रेमीं सहभागी झाले होते.