इस्त्रोच्या अध्यक्षपदाची सुत्रे डॉ. व्ही. नारायणन यांनी स्वीकारली

0

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ८ जानेवारी रोजी व्ही. नारायणन यांची इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. व्ही. नारायणन यांनी एस. सोमनाथ यांची जागा घेतली आहे. डॉ. व्ही. नारायणन यांनी प्रतिष्ठित शास्त्रज्ञ यांनी अवकाश विभागाचे सचिव, अवकाश आयोगाचे अध्यक्ष आणि इस्रोचे अध्यक्ष म्हणून १३ जानेवारी रोजी पदभार स्वीकारला असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. डॉ. एस. सोमनाथ सोमवारी इस्रोच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाले. त्यांच्या उपस्थितीत डॉ. व्ही. नारायणन यांनी इस्रोचा कार्यभार हाती घेतला. नारायणन राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष होते; ज्यांनी चांद्रयान-२ च्या हार्ड लँडिंगची कारणे शोधून आवश्यक सुधारणांची शिफारस केली. ज्यामुळे अखेर चांद्रयान-३ ला मोहिमेला यश मिळाले. यामुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश ठरला.

सर्व लाँच व्हेईकल प्रकल्प आणि कार्यक्रमांमध्ये निर्णय घेणारी संस्था प्रोजेक्ट मॅनेजमेंट कौन्सिल-स्पेस ट्रान्सपोर्टेशन सिस्टम (पीएमसी-एसटीएस) चे अध्यक्ष म्हणून डॉ. व्ही. नारायणन यांनी इस्रोच्या लाँच व्हेईकलच्या ऑपरेशनल आणि डेव्हलपमेंट उपक्रमांसाठीही मार्गदर्शन केले होते. ते गगनयान मोहिमेच्या राष्ट्रीय स्तरावरील ह्युमन रेटेड सर्टिफिकेशन बोर्ड (एचआरसीबी) चे अध्यक्षदेखील राहिले. रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट प्रोपल्शन तज्ज्ञ असलेले डॉ. व्ही. नारायणन १९८४ मध्ये इस्रोमध्ये रुजू झाले होते. जानेवारी २०१८ मध्ये लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स सेंटरचे संचालक होण्यापूर्वी त्यांनी विविध पदांवर महत्त्वाची भूमिका बजावली.

नारायणन यांनी चांद्रयान-२ मोहिमेतही योगदान दिले आहे. एलव्हीए ३-एम१/चांद्रयान-२ आणि एलव्हीएम3/चांद्रयान-3 मोहिमेदरम्यान त्यांनी टीमचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्त्वाखाली एलव्हीएम ३ व्हेईकल एल-११० लिक्विड स्टेज आणि सी-२५ क्रायोजेनिक स्टेज विकसित आणि डिलिव्हर करण्यात आले होते. ही पृथ्वीवरून चंद्राच्या कक्षेत अंतराळ यानाला घेऊन जाणारी आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या विक्रम लँडरची थ्रॉटलेबल प्रोपल्शन प्रणाली आहे. नारायणन यांनी आयआयटी, खरगपूर येथून क्रायोजेनिक अभियांत्रिकीमध्ये एमटेक आणि एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पीएचडी शिक्षण पूर्ण केले. एमटेक प्रोग्राममध्ये पहिली रँक मिळवल्याबद्दल त्यांना रौप्य पदकाने सन्मानित करण्यात आले होते. २०१८ मध्ये त्यांना खरगपूर आयआयटीकडून डिस्टिंग्विश्ड अल्युमनी पुरस्कार आणि २०२३ मध्ये लाईफ फेलोशिप पुरस्काराने सन्मानित केले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech