नवी दिल्ली : केंद्र सरकारने हिंदी भाषेचा महिना साजरा करू नये अशी मागणी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी केलीय. यासंदर्भात स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले आहे. इतकेच नव्हे तर स्टॅलिन यांनी दूरदर्शनच्या सुवर्णमहोत्सवी समारंभासह हिंदी महिन्याच्या समारोपाच्या आयोजनाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करताना सीएम स्टॅलिन यांनी लिहिले की, चेन्नईतील दूरदर्शनच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला हिंदी महिन्याच्या समाप्तीशी जोडल्याचा मी तीव्र निषेध करतो.
भारतीय संविधान कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देत नाही, हिंदी आणि इंग्रजीचा वापर केवळ कायदा, न्यायव्यवस्था आणि केंद्र आणि राज्य सरकारांमधील संवाद यासारख्या अधिकृत कामांसाठी केला जातो. अशा स्थितीत भारतासारख्या बहुभाषिक देशात हिंदीला विशेष स्थान देणे आणि अहिंदी भाषिक राज्यांमध्ये हिंदी महिना साजरा करणे हा इतर भाषांचा अवमान करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे हिंदी भाषेवर आधारित असे कार्यक्रम बिगरहिंदी भाषिक राज्यांमध्ये टाळता येतील किंवा केंद्र सरकारला अजूनही असे कार्यक्रम आयोजित करायचे असतील तर स्थानिक भाषा महिनाही तितक्याच उत्साहाने आयोजित करणे आवश्यक आहे. स्टॅलिन ज्या कार्यक्रमाबद्दल बोलत होते त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तामिळनाडूचे राज्यपाल होते.