नवी दिल्ली : भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी नागरी विमान वाहतूक बाजारपेठांपैकी एक आहे देशातील वाढत्या हवाई प्रवासाची मागणी पूर्ण करण्यासाठी एअरलाइन्स त्यांच्या ताफ्याचा तसेच नेटवर्कचा विस्तार करत आहेत, ज्यामुळे भारताला जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या नागरी उड्डाण बाजारपेठांपैकी एक बनले आहे. एअर इंडियाकडे ३०० विमाने आहेत. आगामी ३ वर्षांत त्यांच्या ताफ्यात सुमारे ४०० विमाने असतील, असा विश्वास एअरलाइनला आहे.
भारताच्या देशांतर्गत मार्गांवरील हवाई प्रवासी वाहतूक २०२४ मध्ये ६.१२ टक्क्यांनी वाढून १६१.३ दशलक्ष झाली. गेल्या वर्षी ही वाहतूक १५२ दशलक्ष होती. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) ही माहिती दिली. यासंदर्भातील माहितीनुसार डिसेंबर २०२४ मध्ये भारताच्या व्यावसायिक विमान कंपन्यांमध्ये १.४९ कोटींहून अधिक प्रवाशांनी उड्डाण केले. गेल्या वर्षीच्या डिसेंबर २०२३ च्या १.३८ कोटींच्या तुलनेत हे प्रमाण ८ .१९ टक्के अधिक आहे. डिसेंबरमध्ये इंडिगोचा मार्केट शेअर ६४.४ टक्के होता. त्याचवेळी एअर इंडियाचा वाटा २६ .४ टक्के होता.
याशिवाय, आकासा एअर आणि स्पाइसजेटचा वाटा अनुक्रमे ४.६ टक्के आणि ३.३ टक्के होता. डीजीसीएच्या आकडेवारीनुसार, देशांतर्गत हवाई प्रवासी वाहतुकीतील इंडिगोचा वाटा २०२३ मध्ये ६०.५ टक्क्यांवरून २०२४ मध्ये ६१.९ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे, या वर्षात एअरलाइनने ९.९९ कोटी देशांतर्गत प्रवासी वाहतूक केली आहे. याच काळात स्पाइसजेटचा बाजारातील हिस्सा ५.५ टक्क्यांवरून ३.७ टक्क्यांवर घसरला.
याकाळात उड्डाण रद्द झाल्यामुळे ६७ हजार ६२२ प्रवाशांना फटका बसला होता. डिसेंबरमध्ये नियोजित देशांतर्गत विमान कंपन्यांचे एकूण उड्डाण रद्द करण्याचा दर १.०७ टक्के होता. उड्डाण रद्द झाल्यामुळे ६७ ,६२२ प्रवाशांना फटका बसला. उड्डाण विलंबामुळे २.८ लाख प्रवासी प्रभावित झाले होते आणि डिसेंबरमध्ये विमान कंपन्यांनी सुविधेसाठी ३.७८ कोटी रुपये दिले असल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.