मस्साजोग हत्याकांड प्रकरणी आतापर्यंतच्या तपासाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
मुंबई : राज्यातील बहुचर्चित बीड हत्याकांड प्रकरणामध्ये रोज नव नवे खुलासे समोर येत आहेत, यामध्ये भाजपा आमदार सुरेश धस यांच्यांकडून विविध गोपनिय माहित्या समोर येत असल्याने राज्यातील सत्ताधारी मंत्रीच या प्रकरणात सामील असल्याची माहिती वारंवार समोर येत आहे. त्या अनुशंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे एसपी नवनीत कावत आणि सीआयडी अधिकाऱ्यांना आज फोन करुन मस्साजोग हत्याकांड प्रकरणी आतापर्यंतच्या तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये. तपासात जे-जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, कुणालाही दया माया दाखवू नका, अशा शब्दात तपास अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
एकीकडे सरपंच हत्या प्रकरणाचा सीआयडीकडून वेगाने तपास सुरू आहे. मात्र, तपास अधिकाऱ्यांकडून पीडित देशमुख कुटुंबीयांना त्याबाबत माहिती दिली जात नाही, त्यामुळे धनंजय देशमुख यांनी आज टाकीवर चढून आंदोलन केले. तसेच, माझ्या भावासारखंच मलाही मारुन टाकलं जाईल, त्यापेक्षा मीच जीवन संपवतो म्हणत संतापही व्यक्त केला. त्यानंतर, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन धनंजय देशमुख यांचे मन वळवले.
दरम्यान मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांच्यासह सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत वाल्मिक कराडला 302 चा आरोपी करावा, अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्वरीत बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि एसआयटी प्रमुखांना फोन करुन तपासात कुणावरही दया माया दाखवू नका, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
याबाबत केरे पाटलांनी सांगितले की, आज आम्ही संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी निवेदन द्यायला आलो होतो, पण मुख्यमंत्र्यांकडे वेळ नव्हता. त्यामुळे, आम्ही निवेदन गेटवर चिटकवलं आणि ठिय्या आंदोलन करु असं सांगितले. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला भेटीची वेळ देण्यात आली, आमचं निवेदनही स्वीकारलं. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, यात लक्ष घातलं तर ठीक आहे नाहीतर मराठा समाज मुख्यमंत्री असो किंवा कोणी आम्ही त्यांना फिरु देणार नाही, असा इशारा केरे पाटील यांनी दिला. यावेळी बोलतांना संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे पाटील यांनी सांगितले.