नवी दिल्ली – कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केली. केजरीवाल यांच्यावरील कारवाईनंतर जर्मनीने टिप्पणी करत केजरीवाल यांना निष्पक्ष खटला चालवण्याची संधी मिळेल, अशी आशा असल्याचे म्हटले होते. यावर भारताने जर्मनीला खडेबोल सुनावले होते. यानंतर अमेरिकेनेही अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाईबाबत टिप्पणी केली होती. अमेरिकेच्या टिप्पणीनंतर भारताने बुधवारी (२७ मार्च) अमेरिकेच्या उपराजदूत ग्लोरिया बेरबेना यांना बोलावून घेत यासंदर्भात तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले, “भारतातील काही कायदेशीर कार्यवाहीबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने दिलेल्या टिप्पण्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो. इतरांच्या सार्वभौमत्वाचा आणि अंतर्गत बाबींचा आदर करणे अपेक्षित आहे. भारताच्या कायदेशीर प्रक्रियांवर आणि एक स्वतंत्र न्यायव्यवस्था जी वस्तुनिष्ठ आणि वेळेवर निकालासाठी वचनबद्ध आहे. त्यावर आक्षेप घेणे अयोग्य आहे”, अशा शब्दात भारताने आक्षेप नोंदवला.