धनगर समाज आक्रमक; यशवंत सेना लोकसभेच्या मैदानात

0

मुंबई – राज्यात यशवंत सेना लोकसभेच्या मैदानात उतरली असून येत्या लोकसभा निवडणूकीत तीसपेक्षा अधिक लोकसभा मतदार संघात धनगर समाजाची ताकद आहे. मात्र सध्या लोकसभेच्या जागावाटपाचा विचार करता धनगर समाजाला एकाही लोकसभा मतदार संघात स्थान दिल्याचे दिसत नाही. सरकारने धनगर समाजाच्या तोंडाला आरक्षणाबाबत पानेच पुसली आहेत. संधी देण्याऐवजी डावलले जात आहे. त्यामुळे धनगर समाजाचा अधिक प्रभाव असलेल्या राज्यातील १५ लोकसभा मतदार संघात यशवंत सेना उमेदवार उभे करणार असून उमेदवाराच्या नावाची लवकर घोषणा करणार असल्याचे यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले.

नगर येथे रविवारी (ता. २४) यशवंत सेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. धनगर समाजाच्या आरक्षणासह अन्य प्रश्नांवर राज्यभर लढा देणाऱ्या आणि समाजात अधिक प्रभाव असलेल्या यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या पाश्वभूमीवर माहिती दिली. बाळासाहेब दोडतले म्हणाले, ‘‘धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा यासाठी आम्ही राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी पहिल्यांदा २१ दिवस उपोषण केले. आश्वासन दिल्यावर उपोषण मागे घेतले. सरकारने दिलेली मुदत संपल्यावर पुन्हा उपोषण केले. मात्र आरक्षण देण्याबाबत दोन वेळा सरकारकडून शब्द देऊनही शेवटी फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.’’

तीसपेक्षा अधिक लोकसभा मतदार संघात प्रभाव असतानाही धनगर समाजाला जाणीवपूर्वक डावलले जात असल्‍याचे स्पष्‍ट झाले असल्याने आता धनगर समाजाचा प्रभाव असलेल्या नगर, शिर्डी, नाशिक, माढा, सोलापूर, सांगली, बारामती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, यवतमाळ, सातारा, व जालना या पंधरा मतदार संघात धनगरसेना आपले उमेदवार उभे करणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech