साध्या पद्धतीने धनंजय मुंडे यांनी भरला उमेदवारी अर्ज

0

बीड – कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भगिनी तथा विधान परिषद सदस्य आ. पंकजाताई मुंडे, माजी खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्यासह परळी मतदारसंघातील लाडक्या बहिणींच्या सोबतीने आपला उमेदवारी अर्ज आज परळी येथील तहसील कार्यालयात दाखल केला आहे. धनंजय मुंडे यांनी साध्या पद्धतीने, कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता दुपारी 1 वाजेच्या दरम्यान आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी स्वतः आ.पंकजाताई मुंडे यांनी सुचकाची भूमिका निभावली.

अर्ज दाखल करण्यापूर्वी नाथरा येथील निवासस्थानी धनंजय मुंडे यांचे त्यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई पंडितराव मुंडे यांनी औक्षण करून आशीर्वाद दिले. यावेळी राजश्रीताई धनंजय मुंडे व धनंजय मुंडे यांच्या ज्येष्ठ भगिनी शकुंतलाताई केंद्रे या उपस्थित होत्या. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी नाथरा येथील ग्रामदैवताचे दर्शन घेऊन गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतीस्थळी पांगरी येथील गोपीनाथ गडावर जाऊन स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांना नमन केले.

परळी शहरात आल्यानंतर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या मंदिरात जाऊन विधिवत पूजन करून धनंजय मुंडे यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर पिता स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे यांच्या कनेरवाडी परिसरातील समाधीस्थळी जाऊन अभिवादन करत आशीर्वाद घेतले. परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याचबरोबर रेल्वे स्थानक परिसरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर धनंजय मुंडे हे आपल्या भगिनी आ. पंकजाताई, डॉ. प्रीतम ताई यांसह सहकाऱ्यांच्या समवेत तहसील कार्यालयात अर्ज सादर करण्यासाठी दाखल झाले.

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आपण कोणतीही निवडणूक हलक्यात घेत नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असो, लोकसभा असो किंवा विधानसभा असो, प्रत्येक निवडणूक आपण पूर्ण ताकतीने लढत असतो; त्यामुळे यशाची हमखास खात्री मिळते. विरोधकांना कोण उमेदवार मिळेल किंवा आपल्या विरोधात कोण उभे असेल याबाबतची काळजी न करता मी आजवर केलेली कामे आणि माझ्या मनात असलेले विकासाचे व्हिजन घेऊन लोकांमध्ये जाणार आहे आणि स्वतःसाठी मतदान रुपी आशीर्वाद मागणार आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.

मी आज महायुतीतील घटक पक्षाची नेता म्हणून आणि बहीण म्हणून धनुभाऊंच्या या निवडणुकीत आज सुचकाच्या भूमिकेत आले आहे. ही निवडणूक धनु भाऊ व मी परळीसाठी आजवर जे केले, त्या कामांच्या बळावर धनु भाऊ जिंकतील असा मला विश्वास आहे. संपूर्ण निवडणुकीत मीही आता धनुभाऊंच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहे, असे यावेळी आ. पंकजाताई मुंडे म्हणाल्या.

पंकजाताई व प्रीतमताईंनी केले औक्षण
दरम्यान उमेदवारी अर्ज भरायला जाण्याअगोदर आ.पंकजाताई मुंडे, माजी खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी आपल्या यशश्री या निवासस्थानी धनंजय मुंडे यांचे औक्षण करून आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. धनंजय मुंडे यांचे प्रत्येक कार्यक्रम शक्तिप्रदर्शनासह गर्दीचे विक्रम मोडणारे असतात. मात्र, यावेळी प्रथमच साधेपणाने त्यांनी अर्ज दाखल केला. धनंजय मुंडेंनी पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. मागील निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरतानाही त्यांचा याच रंगाचा कुर्ता होता. उमेदवारी अर्ज दाखल करताना पंकजाताई व प्रीतमताईसह मतदारसंघातील मराठा, मुस्लिम, बंजारा या सर्व समाज घटकातील महिला भगिनींसोबत अर्ज दाखल केला. यातील काही महिला गुलाबी रंगाच्या साड्या घालून आल्या होत्या. सध्या अजितदादा पवार यांच्या जनसन्मान यात्रेत गुलाबी रंग थीम होती, तेही या अर्ज भरताना आज उठून दिसू लागले !

बंजारा समाजातील महिला पारंपारिक वेशभूषेत आल्या होत्या.
सन 2009 च्या विधानसभा निवडणुकीसाठी धनंजय मुंडे हे पंकजाताई च्या उमेदवारी अर्जाचे सूचक होते. तर, 2024 च्या निवडणुकीत आज स्वतः पंकजाताई या धनंजय मुंडे यांच्या अर्जास सूचक झाल्या आहेत, या निमित्ताने एक वर्तुळ पूर्ण झाले. साधेपणाने अर्ज भरणार असतानाही मतदारसंघातील जवळपास 5000 पेक्षा जास्त कार्यकर्ते व मतदारांनी स्वयंस्फूर्तीने गर्दी केली होती. पंकजाताई आणि प्रीतमताई यांनी धनंजय मुंडे यांचे औक्षण केले. त्यावेळी व एकत्रित अर्ज भरत असताना दोघेही भाऊक झाल्याचे जाणवत होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech