उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही…
मुंबई : अनंत नलावडे
महाबळेश्वर आणि पाचगणी येथील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तसेच इथे येणाऱ्या पर्यटकांना पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.सातारा जिल्ह्यातील दरे या मूळ गावी आज आले असता आपल्या निवासस्थानी संबंधित अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विश्रांती घेण्यासाठी सध्या सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळगावी आले आहेत.तिथे गेले दोन दिवस आराम केल्यानंतर आजपासून त्यांनी पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर येत कामाला सुरुवात केली. त्याची सुरुवात म्हणून आपल्या दरे येथील निवासस्थानी त्यांनी आज महाबळेश्वर आणि पाचगणी नगर परिषदांचे मुख्याधिकाऱ्यांना बोलावून या दोन्ही नगरपरिषदांची आढावा बैठक घेतली.यावेळी या दोन्ही नगरपरिषदांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. यात महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन्ही पर्यटनस्थळांवर नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात.यावेळी घाटातील रस्ते अरुंद असल्याने इथे वारंवार मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पर्यटकांना अडकून पडावे लागते.यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक ते उपाय करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.
तसेच येणाऱ्या वाहनांना पुरेसे पार्किंग उपलब्ध व्हावेत यासाठी नव्याने पार्कींग लॉट तयार करावे, शक्य असेल तिथे एलिव्हेटेड पार्कींगचा प्रकल्प राबवावा असेही त्यांनी सुचवले.तसेच इथे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना योग्य त्या सुविधा देताना त्यांना सौजन्यपूर्ण वागणूक मिळेल याकडे विशेष लक्ष द्यावे असेही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांना वारंवार इथे यावेसे वाटावे यासाठी त्यांना आकर्षित करण्यासाठी काही नाविन्यपूर्ण प्रकल्पही राबवावे असेही सुचवले. त्यासाठी लागणारा निधी नगरविकास विभागाच्या माध्यमातून देण्याच्या सूचना देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या असून या दोन्ही नगरपरिषदांना लागेल तो निधी तत्काळ देण्यासही त्यांनी या बैठकीत मान्यता दिली.यावेळी महाबळेश्वर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील,पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव आणि महाबळेश्वर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बी.पी. सांडभोर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.