अमृत योजनेअंतर्गत कल्याण-डोंबिवलीसाठी ३५७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

0

नव्याने समाविष्ट २७ गावांना होणार सुरळीत पाणी पुरवठा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याची भावना

मुंबई : कल्याण डोंबिवली शहरासाठी अमृत योजनेअंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे कल्याण डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट २७ गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी मदत होणार आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. या योजनेला मान्यता मिळाल्याने उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा, पर्जन्य जलवाहिनी, नागरी परिवहन व हरित क्षेत्र विकास इ. पायाभूत सुविधांची निर्मिती शहरांमध्ये करण्यात येत आहे. त्यानुसार कल्याण डोंबिवली शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सुधारित तांत्रिक बदल प्रस्तावाला राज्यस्तरीय तांत्रिक समिती तसेच राज्यस्तरीय उच्चाधिकार सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये मंजूरी देण्यात आली होती. त्यास अनुसरून या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

अमृत अभियानाची प्रकल्प विकास व व्यवस्थापन सल्लागार (PDMC) असणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सादर केलेल्या तांत्रिक बदलाच्या ३५७.१६ कोटी रुपयांच्या प्रकल्प किंमतीस मान्यता उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. या योजनेचा लाभ कल्याण डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट २७ गावांना होणार आहे. त्यामुळे सुरळीत पाणीपुरवठा होण्याबरोबरच १०५ दलघमी साठवण क्षमता देखील निर्माण होणार आहे. या योजनेला मान्यता देण्याचा शब्द उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कल्याण-डोंबिवलीकरांना दिला होता. हा दिलेला शब्द पूर्ण केल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech