नवी दिल्ली : दिल्लीतील १८ वर्षांवरील प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात दरमहा २१०० रुपये जमा केले जातील असे आश्वासन आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी आज, गुरुवारी दिले. दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांच्या उपस्थितीत केजरीवाल यांनी ही महिला सन्मान योजना जाहीर केली.या योजनेंतर्गत दिल्लीतील आप सरकार महिलांना दरमहा १००० रुपये देणार आहे. या योजनेसाठी उद्यापासून नोंदणी सुरू होईल असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. महिला आपल्या देशाचे भविष्य घडवतात. त्यांच्या कामाला हातभार लावणे हे आम्ही आमचे सौभाग्य समजतो. दिल्लीतील दोन कोटी लोकांच्या सोबतीने आम्ही सर्वात मोठे अडथळे पार केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेची रक्कम दरमहा २१०० रुपये करण्यात येईल, असे आश्वासन केजरीवाल यांनी दिले आहे.
यावेळी केजरीवाल म्हणाले की, आज मी दिल्लीतील लोकांसाठी दोन मोठ्या घोषणा करत आहे. दोन्ही घोषणा महिलांसाठी आहेत. मी आश्वासन दिले होते की मी प्रत्येक महिलेला एक हजार रुपये आर्थिक साहाय्य दिले जाईल. हा प्रस्ताव आज सकाळी मुख्यमंत्री अतिशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. येत्या १० ते १५ दिवसांत निवडणुका जाहीर होतील. त्यामुळे सध्यातरी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करणे शक्य नाही. काही महिलांचे म्हणणे आहे की सध्याची महागाई पाहाता एक हजार रुपये पुरेसे नाहीत. त्यासाठी आम्ही महिलांना दरमहा २१०० रुपये देणार आहोत. दिल्लीतील लोकांसाठी चांगले काम करण्यापासून कोणताही अडथळा आम्हाला रोखू शकला नाही असे त्यांनी सांगितले.