* महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक क्रांती घडविली – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ
* राज्यात मंडल आयोग लागू करण्याचं पवार साहेबांचे योगदान मोठे ; सर्व समाज त्यांचा कायमच ऋणी राहील – छगन भुजबळ
* महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे साहित्य आजही समाजाला तितकेच प्रेरक – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ
चाकण,नाशिक : महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवून लढा दिला. वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिलं. त्यांच्या साहित्यातून त्यांचे विचार पुढे येतात त्यांचे विचार आजही तितकेच प्रेरक असून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक क्रांती घडविली असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
चाकण बाजार समितीच्या प्रांगणात महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्र पवार व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी खा.डॉ.अमोल कोल्हे, माजी मंत्री सचिन अहिर,आमदार बाबाजी काळे,माजी आमदार ॲड रामभाऊ कांडगे ,बाळासाहेब शिवरकर,सुर्यकांत पलांडे,दिलीपराव ढमढेरे,चंद्रकांत दळवी,कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती विजयसिंह शिंदे,उपसभापती क्रांती सोमवंशी ,बापू भुजबळ, दिलिप खैरे, ॲड.सुभाष राऊत,वसंत लोंढे ,शांतारामघुमटकर ,प्रितेश गवळी ,विनायक घुमटकर,तुकाराम कांडगे,अनिकेत केदारी,राम गोरे,अमर हजारे,सुहास गोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी त्यांची केलेली निवड ही अतिशय योग्य आहे. कारण महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या वाड्याचे नूतनीकरण शरदचंद्र पवार साहेब यांनी मुख्यमंत्री असताना केले. राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते हा वाडा राष्ट्राला अर्पण करण्यात आला. त्या अगोदर जालना येथे पार पडलेल्या समता परिषदेच्या बैठकीत मंडल आयोगाच्या शिफारसी पवार साहेबांनी लागू केल्या. त्यांनी केलेलं हे काम कुणीही नाकारू शकणार नाही. त्यांच्या या कार्याचे आम्ही सर्व कायम ऋणी राहू असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, महात्मा जोतीराव फुले यांनी शिक्षणासोबत शेती क्षेत्रासाठी अतिशय महत्वाचे योगदान दिलं आहे. शेतकरी गुलामगिरीतून मुक्त झाला पाहिजे यासाठी ब्रिटिश सरकारकडे शेतीचे शिक्षण घेण्यासाठी त्याचा अभ्यास क्रमात समाविष्ट करण्याची मागणी केली. आधुनिक शेतीची कास धरायला सांगून शेतकऱ्यांना शेतीच्या व्यवस्थापनाचे धडे दिले. आजही त्यांनी शेती क्षेत्रासाठी सुधारणा सुचविल्या त्या आजही तितक्याच महत्वाच्या आहे. केवळ शिक्षणच नव्हे तर धरणांची निर्मिती, बोगदे यासह विविध इमारती त्यांनी उभ्या करण्यासाठी त्यांचं योगदान होतं.समाजसेवा करतांना स्वतः खर्च करून समाजाची सेवा केली असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, महात्मा जोतीराव फुले यांचा लढा अंधश्रद्धेच्या विरोधात होता. कुठल्याही समाजाच्या विरोधात नव्हता. त्यांचा ब्राम्हण समाजाला विरोध नव्हता तर ब्राह्मण्यवादाला विरोध होता. प्लेगच्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलगा यशवंतच्या माध्यमातून रुग्णालय सुरू करून आपल्या प्राणांची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. कुणी जातीनी नव्हे तर कामाने श्रेष्ठ ठरतात,अशी शिकवण फुले दांपत्याने समाजाला दिली असल्याचे छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात सांगितले.