अमरावती : अमरावतीकरांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच अमरावतीमधून मुंबई आणि पुण्याला जाण्यासाठी वंदे भारत ट्रेन धावणार आहेत. रेल्वे प्रशानाने मुंबई- अमरावती आणि पुणे- अमरावती या २ वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात फक्त पुणे आणि मुंबई या ठिकाणावरून वंदे भारत ट्रेन धावतात. मुंबईतून धावणाऱ्या या वंदे भारत ट्रेन सध्या सोलापूर, शिर्डी, गोवा, कोल्हापूर शहरांमध्ये जातात. आता मुंबईवरून अमरावती आणि पुण्यातून अमरावतीसाठी वंदे भारत ट्रेन धावणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचा प्रस्ताव मध्य रेल्वे प्रशासनाकडून केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. या वंदे भारत ट्रनेचे संभाव्य वेळापत्रक देखील तयार आहे. या वंदे भारत ट्रेनमुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना फायदा होणार आहे आणि त्यांचा प्रवास सुसाट होणार आहे.
अमरावती रेल्वेस्थानकावरून पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी ‘मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’ सुटेल. ही ट्रेन साडे सहा तासांमध्ये म्हणजे सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी मुंबईत पोहोचेल. ही ट्रेन अमरावतीनंतर अकोला जंक्शन, शेगाव, भुसावळ जंक्शन, जळगाव जंक्शन, मनमाड आणि नाशिक जंक्शन या रेल्वे स्थानकावर थांबेल. यानंतर ही वंदे भारत ट्रेन मुंबईवरून दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी अमरावतीकडे परतीच्या प्रवासासाठी रवाना होईल. यानंतर रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी अमरावती स्थानकावर पोहचेल.