मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. काल जाहीर झालेल्या उमेदवार यादीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “मी लहानपणापासून दादर माहीममध्ये वाढलो आहे. माझी आई, माझे वडील किंवा मी आमच्या तीन पिढ्या आम्ही इथे वाढलो आहे. त्यामुळे दादर-माहीम हा मतदारसंघ आम्ही जवळून ओळखतो. मी अनेकदा इथे चालत असताना मला अनेकजण भेटतात. ते त्यांच्या समस्या सांगतात. मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे दादर-माहीम हा मतदारसंघ माझ्यासाठी एक कम्फर्ट झोन आहे”, असेही अमित ठाकरे म्हणाले.
“मी सिद्धिविनायक मंदिरात अनेकदा जातो. माझी इच्छा झाली की मी सिद्धिविनायक मंदिरात चालत जातो. तिथे जाऊन पाया पडून येतो. तिथे जाऊन काही मागत नाही. त्याने खूप दिलेलं आहे”, असेही अमित ठाकरेंनी सांगितले. यावेळी अमित ठाकरे यांना पहिली निवडणूक लढवणार आहात, काय भावना आहेत, कसं वाटतंय असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. “माझ्या आत्मविश्वास खूप आहे. पण उमेदवार यादीत माझे नाव आल्यानंतर माझ्या पोटात गोळा आला.
कारण आता मला समजलं आहे की माझं आयुष्य पूर्णपणे चेंज होणार आहे. मी याआधी जसं वावरत होतो, तसं आता वावरु शकत नाही. मी जे स्वतंत्रपणे राहत होतो, तसं आता राहू शकणार नाही. कारण त्या शासकीय पदाचे ओझं इतकं असतं. मी ते ओझं घ्यायला तयार आहे. फक्त आता पोटात गोळा आला आहे. जो येईल असे मला वाटले नव्हते”, असे अमित ठाकरे म्हणाले. मी सदा सरवणकर आणि ठाकरे गटाच्या उमेदवाराला शुभेच्छा देतो. राजसाहेब ठाकरे हे कायमच ठाम भूमिका घेतात. ती उपकाराची भूमिका नसते. मी उपकार केलेत अशी त्यांची भूमिका नसते. तसेच समोरच्याने त्याची परतफेड करावी, अशी कधी त्यांची इच्छाही नसते”, असे अमित ठाकरेंनी म्हटले.