चेन्नई : डी गुकेशने वयाच्या 18 व्या वर्षी जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनण्यासाठी चीनचा विद्यमान विजेतेपदधारक डिंग लिरेनचा पराभव करून इतिहास रचला आहे. चेन्नईच्या विमानतळावर गुकेशचे आज, सोमवारी जंगी स्वागत करण्यात आले. विश्वनाथन आनंद यांच्यानंतर जागतिक स्पर्धा जिंकणारा गुकेश हा पहिलाच भारतीय आहे. २०१२ नंतर प्रथमच भारतात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची ट्रॉफी आली आहे. मायदेशात परतल्यावर डी गुकेश म्हणाला कि, ‘मला खूप आनंद झालाय.. एवढं प्रेम मला मिळतंय आणि त्यावरून हा विजय किती महत्त्वाचा आहे, हे समजतेय. गुकेशने जागतिक स्पर्धेच्या ट्रॉफीसह जवळपास 11 कोटी रुपयांची कमाई केली. गुकेशने जागतिक स्पर्धेच्या ट्रॉफीसह ११ कोटींचं बक्षीस कमावलं. पण, या ११ कोटींतून ४.६७ कोटी रक्कम ही कर म्हणून कापली जाणार आहे. भारतात बक्षीस रकमेवरील आयकर दर तुलनेने जास्त आहेत. भारतात गुकेश ३०% टॅक्स स्लॅबमध्ये येण्याची शक्यता आहे. गुकेशची बक्षीस रक्कम केवळ अर्धी झाली असून बक्षीस रकमेवर सरकार ४२.५ टक्के कर वसूल करणार आहे.
डी गुकेशला वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकण्यासाठी १३ लाख डॉलर्स म्हणजेच अंदाजे ११.०३ कोटी रुपये मिळाले ज्यातून सुमारे पाच कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. वृत्तानुसार, गुकेशच्या बक्षीस रकमेपैकी सुमारे ४.६७ कोटी रुपये टॅक्स म्हणून काढून घेतले जातील. अशाप्रकारे, ११ कोटी जिंकून गुकेशच्या वाटल्याला केवळ सहा कोटी येऊ शकतात. गुकेशच्या कर विधेयकाच्या बातमीनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक नेटिझन्सनी मोठ्या कर रकमेबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे, काहींनी बक्षीस रकमेवरील उच्च कर दरांवर टीका केली आहे. दुसरीकडे, अनेक वापरकर्त्यांनी करप्रणालीचा बचाव केला आहे आणि असा युक्तिवाद केला आहे की देशाची अर्थव्यवस्था राखण्यासाठी हा एक आवश्यक भाग आहे