नवी दिल्ली – बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या रेमल चक्रीवादळाने बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला धडक दिली. या वादळामुळे बांगलादेशातील किनारपट्टी भागात आज मुसळधार पाऊस कोसळला. जोरदार वाऱ्यामुळे या भागातील झाडे उन्मळून पडली आहे. काही भागात विजेचे खांब पडल्यामुळे बत्तीदेखील गुल झाली. दरम्यान, रविवारी रात्री कोलकात शहरात १४० मिमी इतका पाऊस झाला. या पावसामुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अनेक ठिकाणी वाहतूक सेवा विस्कळीत झाली.
हवामान विभागानुसार, ‘बांगलादेशच्या मोंगला बंदराच्या किनारी भाग आणि पश्चिम बंगालच्या द्वीप समूहात १३५ किमी प्रती तास वेगाने वारे वाहत होते.’ यामुळे कच्च्या घरांचे पत्रे उडाले. बांगलादेशासहित पश्चिम बंगालपर्यंत मातीचे घरे जमीनदोस्त झाले आहेत. या वादळात एकाचा मृत्यू झाला आहे. या पावसात बत्ती गुल झाल्याने लोकांना अंधारात राहावे लागले.
या वादळाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि बांगलादेशने तयारी केली होती. मोंगला, चटगाव बंदर, किनारपट्टीभागातून साधारण ८ लाख लोकांना इतरत्र हलविण्यात आले होते. भारतातील १ लाख लोकांना गावांचे स्थलांतर करण्यात आले.
बांगलादेशातील राजधानी ढाकामध्ये चक्रीवादळापासून बचाव होण्यासाठी ८ हजार निवारे बांधण्यात आले होते. भारतात नौदलाने बोट, एअरक्राफ्ट, औषधांची तयारी केली होती. जोरदार वाऱ्यासहित कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर जागोजागी पाणी साचले होते. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी किनारपट्टीला धडकल्यानंतर हे वादळ उत्तरेकडे सरकत आहे. ते कमकुवत झाले असले तरी वादळाचा प्रभाव पुढील दोन दिवस टिकू शकतो. पश्चिम बंगालमधील उत्तर आणि दक्षिण २४ परगणा, पूर्व मेदिनीपूर या भागात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.