डोंबिवली : आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण बेसुमार वाढत आहे त्याला सायबर युद्ध असे संबोधले जाते, असे वक्तव्य सायबरतज्ञ आशिष बोबडे यांनी डोंबिवलीत केले. पूर्वेकडील स्वामींच्या घराच्या अंतर्गत चैतन्यप्रभा मंडळातर्फे नुकतेच सावधान सायबर गुन्ह्यांचे जाळे विषयावर सायबरतज्ञ आशिष बोबडे यांनी आपले विचार मांडले. यावेळी बोलतांना बोबडे म्हणाले. सायबर गुन्ह्यांपैकी मोठ्या संख्येने गुन्हे महिलांच्या बाबतीत घडत असतात. यामध्ये ईमेल द्वारे होणारा छळ, सायबर स्टफिंग, सायबर मार्फिंग, सायबर डीपुमेशन, सायबर पाॅनोग्राफी यांचा अंतर्भाव असतो.
दरम्यान बोबडे म्हणाले, सायबर गुन्हा म्हणजे संगणक, नेटवर्क किंवा नेटवर्क उपकरणांचा वापर करून केलेला बेकायदेशीर गुन्हा ! तसेच सायबर गुन्ह्यांमध्ये पारंपरिक गुन्हेगारी क्रियाकलपांचाही समावेश असू शकतो. सायबर गुन्ह्यांची काही उदाहरणे लक्षात घेणे जरुरीचे आहे. फिशिंग, स्पूफिंग, डॉस हल्ला, क्रेडिट कार्ड फसवणूक, ऑनलाईन व्यवहार फसवणूक, सायबर बदनामी, बाल पोर्नोग्राफी आदी आहेत. सायबर क्राईम ही गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. नेटवर्क किंवा नेटवर्क उपकरण यात समाविष्ट असते. बहुतेक सायबर गुन्हेगार नफा किंवा पैसा मिळवण्यासाठी सायबर गुन्ह्यांचा वापर करतात. तर काही सायबर गुन्ह्यांमुळे संगणक किंवा इतर उपकरणांचे थेट नुकसान होवू शकते.
सायबर क्राईम म्हणजे काय व ते कसे रोखता येईल याबाबत भाष्य करताना त्यांनी पुढे सांगितले की, समाज माध्यामाचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा, ऑनलाईन खरेदी विक्री करताना दक्षता घ्यावी. बॅकिंग व्यवहार डोळसपणे करावेत. आधारकार्ड, पॅनकार्ड व पासवर्डनंबर मोबाईल नंबर समाज माध्यमांवर टाकू नयेत अधिकृत ॲपच डाऊनलोड करावेत. खाजगी मजकूर किंवा फोटो समाज माध्यमांवर टाकू नयेत. संशयित काॅल घेवू नयेत. डिजिटल अटकेपासून सावध राहावे. शंका आल्यास ताबडतोब पोलीसांनी संपर्क साधावा. सायबर गुन्ह्यांची तक्रार भारतातील कोणत्याही सायबर सेलमध्ये करता येते. शिवाय ऑनलाईन किंवा ऑफलाईन पण करता येते.