ठाणे : ठाणे महानगरपालिका शाळांचा मध्यवर्ती सांस्कृतिक महोत्सव काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे नुकताच संपन्न झाला. ठाणे महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये उत्तम कलागुण असून त्यांना बाल रंगकर्मी योजनेत प्रशिक्षण देऊन या विद्यार्थ्यांचे एखादे बालनाट्य बसवून महाराष्ट्राभर त्याचे २५ प्रयोग व्हावेत, असे प्रतिपादन अभिनेते आणि निर्माते मंगेश देसाई यांनी ठाणे महानगरपालिका शाळांचा सांस्कृतिक महोत्सवाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात केले. सांस्कृतिक महोत्सव २०२४-२५ मध्ये नृत्य आणि नाट्य विभाग अशा दोन प्रकारांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. नृत्यविभागात इयत्ता १ ली ते ५वीच्या एकूण २४, इयत्ता ६ वी ते ८ वीच्या ६१ शाळांनी, तर नाट्य विभागांमध्ये १९ अशा एकूण १०४ शाळांनी भाग घेतला होता. त्यामधून बक्षीसपात्र विद्यार्थी व शाळांना मंगेश देसाई, बालकलाकार मायरा वायकूळ, उपायुक्त (शिक्षण) सचिन सांगळे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बक्षीसपात्र १३ नृत्ये आणि २ नाटके असे १५ कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले
प्रारंभी ठाणे मनपा शाळा क्र. १३. खोपटच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ठाणे महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी विद्यार्थी बालकलाकारांचे आणि मार्गदर्शक शिक्षकाचे कौतुक केले. तसेच, बालकलाकार मायरा हिने सर्वांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी, गटाधिकारी संगीता बामणे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी बाबाजी फापाळे, जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी ठाणे व पालघरचे संचालक जगन्नाथ जाधव आदी उपस्थित होते. सांस्कृतिक समिती २०२४-२५च्या कार्याध्यक्षा अनघा पालांडे पानी उपस्थिताचे आभार मानले. गटप्रमुख प्रेरणा कदम यांच्या राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समिती सदस्य सुरेश पाटील, नूतन बांदेकर, सहचिटणीस नीलिमा पाटील यांनी केले.