दरवर्षी पितृपक्ष आला की कावळे,पितर आणि पिंड यांचा संबंध जोडून व्यंगचित्रे , विनोद यांचा पूर व्हॉट्स अॅप व इतर मिडियावर येतो. जनसामान्यांची कावळे, पितर (खरं तर लिंगदेहधारी/ सूक्ष्मदेहधारी जीवात्मा ) आणि पिंड यांची एकत्रित भेट होते ती मृताच्या दहाव्या दिवशीच्या कार्यात आणि तीही दुःखद, नाजुक परिस्थितीत. त्यावेळी (वायस) पिंडाला कावळा शिवला का? या प्रश्नाऐवजी XXX(मृतव्यक्तीने) ने पिंड नेला का? हा प्रश्न कसा रूढ झाला हा संशोधनाचा विषय आहे आणि यातच कोठेतरी मृतात्मा कावळ्याच्या रूपाने येतो य़ाचा उगम असावा.
अंत्यविधीत १० व्या दिवशी वेदीवर हे जे काही पिंड ठेवले जातात त्यात प्रेतपिंड, प्रेतसखा, स्मशानरक्षक दहनपती व वायस (कावळा) यांसाठीचे पिंड असतात. अश्म्यावरच्या मृतात्म्याने सूक्ष्मदेहाने त्याच्यासाठी ठेवलेला पिंड स्वीकारून या लोकातून पुढील लोकाकडे आपला पुढील प्रवास सुरु करावा. त्याला उत्तम गती मिळावी अशी मागे राहिलेल्यांची इच्छा असते.
माणसाला कावळा शिवला तर स्नान वगैरे शुद्धीकरण सांगितले आहे. कावळ्याने स्पर्श केलेले अन्न निषिद्ध. कावळाही माणसाजवळ सहसा येत नाही. उघडया जागेत मृतव्यक्तीसाठी ठेवलेल्या पिंडाजवळ कावळ्यासाठी पिंड ठेवणे ही मृतात्म्याला पुढील गती लाभली का? हे तपासण्याची एक परीक्षा(चाचणी ) असावी. कावळ्याला त्या सूक्ष्मदेहधारी व्यक्तीचे,प्रेतात्म्याचे अस्तित्व जाणवते अशी मान्यता आहे व ती कावळ्याला तेथे फिरकण्यास मज्जाव करते. त्याचे कारण वर दिले आहे. जर मृतव्यक्तीचे, अस्तित्वच तेथे नसेल तर कावळा त्याचाच काय ते सर्वच पिंड खाऊ शकतो. कावळ्याने ते अन्न खाल्ले याचा पर्यायी अर्थ त्या सूक्ष्मदेहधारीची इच्छापूर्ती होऊन तो तेथून निघून गेला. त्याला पुढील गती मिळाली. म्हणजे येथेही मृतात्म म्हणजे येथेही मृतात्मा कावळ्याच्या रुपात येत नाही. उलट काहीवेळा नाइलाजाने दर्भाला कावळ्याचे रूप देऊन विधी उरकला जातो. आपले पितर कावळे व्हावे असे कोणाला वाटेल?आपण श्राद्धात पितराना उद्देशून माणसांना अन्न देतो. कावळ्याना नाही. पितरांसाठी नामोल्लेख करून त्याना दिलेले पिंडही उद्वासनानंतर जलात विसर्जित करतो. कावळ्याकुत्र्याचा स्पर्शही टाळतो.
रोजच्या पंचमहायज्ञात भूतयज्ञ असतो यात ज्या मंत्राने काकबली म्हणून अन्न आपण बाहेर ठेवतो त्या मंत्राचा अर्थ पाहिला तर तो भूतबली आहे. बलीची इच्छा असणार्या सर्व बुभुक्षितांसाठी, त्यात चांडाल माणूसही आहे. तो फक्त काकबली नाही. रोज पितरासाठी स्वतंत्र पितृयज्ञ आहे.
हिंदूच्या काही ज्ञातीत सणासुदिला देवाला उपाहार (नैवेद्य ) व बाहेर एक पान वाढून ते जमिनिपासून बर्याच उंचावर ठेवण्याची पध्दत आहे. हा बहुधा काकबली असावा. कागवळ,वाडी (वाढी चा अपभ्रंश) असेही म्हणतात. कुत्र्यानी तो फस्त करुनये म्हणून बहुधा उंचावर ठेवतात. त्यावर कावळे ताव मारतात. याचा कोठेतरी कावळे पितर य़ाच्याशी लोकानी संबंध जोडला असावा असे मला वाटते. पितर कावळ्याच्या रूपात येत असल्याचा धर्मशास्त्रात कोठे उल्लेख आढळत नाही मात्र कावळा यमदूत, यमाचा द्वारपाल मानतात
श्री. हनुमंत महाबळ,
मुक्काम पोस्ट तळकट,
तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग.
+91 75884 47370