(टीम ठाणेकर)
ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारेंसारख्याआपल्या नेत्यांना आवरावे. अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणे सोपे आहे. तर कल्याण लोकसभेत वेगळा निर्णय देखील लागू शकतो, हे लक्षात ठेवावे, असा सणसणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे.
शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारे यांनी अत्यंत चुकीच्या अशा प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दल दिल्या आहेत. शिवसेनेचे नेते सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसची शक्तिस्थळं, स्वाभिमान, मग ती बारामती लोकसभा असेल की रायगड लोकसभा असेल यांच्यावर वारंवार टीका-टिपणी करत असतात. माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की, आपल्या नेत्यांना आवरावे अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. आमच्या स्वाभिमानावर जर कोणी हल्ले करत असतील आणि कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणे सोपे आहे. तर कल्याण लोकसभेत वेगळा निकालदेखील लागू शकतो. हे ध्यानात ठेवावे. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीमध्ये चांगले वातावरण रहावे, असे जर मुख्यमंत्रांना वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर, शिवराळ विजय शिवतारे यांना अडवावे, त्यांना योग्य ती समज द्यावी. आमच्या नेत्यांवर, आमच्या शक्तिस्थळावर, आमच्या स्वाभिमानावर जर कोणी घाला घालत असेल तर कल्याण लोकसभेत देखील वेगळा निर्णय आणि वेगळे चित्र दिसू शकते, एवढेच यानिमित्ताने सांगतो असे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी म्हटले.
२०१९ ला लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामती मतदारसंघात विजय झाला. सातत्याने बारामती मतदारसंघात विकास कामांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिलेला आहे. याहीवेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ येथुन निश्चित विजयी होईल. विजय शिवतारे त्यांचा वैयक्तिक अजेंडा चालवित असतील तर त्यांना योग्य ती समज ही मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे.आम्ही देखील असे अनेक मतदारसंघ आहेत की ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी वातावरण गढूळ करु शकतात. आमच्या सगळ्यांचे श्रद्धास्थान आदरणीय शरद पवार यांच्याबद्दल, व्यक्तिगत खालच्या पातळी वरील टीका तत्कालीन राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना अजितदादा बोलले होते की, तुझा आवाका किती, तु बोलतोस किती, यावेळी तु कसा आमदार बनतो हेच पहातो, असे प्रतिआव्हान दिले होते आणि सार्या महाराष्ट्राला माहित आहे की, अजितदादा जे बोलतात ते करुन दाखवतात. ते त्यांनी करुन दाखविले ! भाजपचे केंद्रीय नेतृत्व गृहमंत्री अमितभाई शहा, भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व नेते, जागावाटपाची योग्य ती बोलणी करतील आणि ठाणे, भिवंडी, कल्याण येथुन महायुतीचा उमेदवार विक्रमी मताधिक्याने विजयी होईल. पण शिवराळ नेते विजय शिवतारे यांना मुख्यमंत्र्यांनी आवरावे अन्यथा कल्याण लोकसभेत वेगळे चित्र दिसेल, असा स्पष्ट इशारा प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे.