सोलापूर : सोलापूर बाजार समितीत मागच्या शनिवारी ५४६ गाड्या कांद्याची आवक होती. त्यावेळी सरासरी भाव साडेतीन हजार रुपये तर जास्तीचा भाव साडेसात हजारांवर होता. पण, ४५२ गाड्या कांद्याची आवक असताना सरासरी भाव अडीच हजारांवर होता. जास्तीत जास्त भाव पाच हजार ४०० रुपयांचा मिळाला, पण तोही केवळ पाच क्विंटल कांद्याला मिळाला. शुक्रवारी सोलापूर बाजार समितीत ११ कोटी ३१ लाख रुपयांची उलाढाल नुसत्या कांद्याच्या व्यवहारातून झाली. पण, शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळाला नसल्याचे दिसून आले. कांद्याची आवक अपेक्षित वाढलेली नसताना देखील भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भाववाढीची शेतकऱ्यांना आशा आहे. कांद्याला प्रतिक्विंटल पाच ते साडेपाच हजारांपर्यंत मिळणारा दर तब्बल एक हजार रुपयाने कमी झाला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ४५२ गाड्या कांदा आला होता. एकूण ४५ हजार २३७ क्विंटलमधील अवघ्या पाच क्विंटल कांद्याला पाच हजार ४०० रुपयांचा दर मिळाला. उर्वरित कांदा सरासरी अडीच हजार रुपये क्विंटल दराने विकला गेला.