ठाणे- जिल्ह्यातील दिवा डम्पिंग बंद केले असल्याने महापालिका प्रशासनाने जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात दिवा-शीळ मुख्य रस्त्यात कचरा टाकणे सुरूच आहे.ही दिव्यातील नागरिकांची घोर फसवणूक आहे.तरी याठिकाणी कचरा टाकणे बंद करा, अन्यथा दिवावासियांच्यावतीने पालिका प्रशासनाविरोधात जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी दिला आहे.
रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे की,गेल्या महिन्यात निवडणुकांचे वातावरण असल्याने दिवा डम्पिंग ग्राऊंड पालिकेने बंद केले असल्याच्या बातम्या विविध वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्या होत्या.भंडार्ली येथे पालिकेतर्फे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला असल्याचे देखील सांगण्यात आले होते.त्यासाठी निधीही खर्च करण्यात आला.तरीही दिवा शहरात डम्पिंगच्या गाड्यांची येजा सुरूच आहे.दिवा-शीळ मुख्य रस्त्यावर अजूनही कचरा टाकला जात आहे. तरी हे डम्पिंग ग्राऊंड पूर्णतः बंद करावे,तसेच संबंधित बेजबाबदार स्वच्छता निरीक्षकावर आयुक्तांनी तातडीने कारवाई करावी, अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल,असा इशाराही रोहिदास मुंडे यांनी यावेळी दिला.