अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील वकीलांच्या पुढाकाराने शिर्डी येथे साईबाबांच्या साक्षीने सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा आधुनिक न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे पुरस्कार देऊन विशेष असा सन्मान करण्यात येणार आहे.भारतातील न्यायसंस्थेचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात मोठे करण्यामध्ये भारताचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा सिंहाचा वाटा आहे.लोकशाही आणि कायद्याचे राज्य बळकट करण्यामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान केला जाणार आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा सन्मान करण्यासाठी अॅड.अशोक कोठारी, अॅड.विश्वासराव आठरे,अॅड.नरेश गुगळे, अॅड.सुभाष भोर,अॅड.किशोर देशपांडे, अॅड. सुभाष काकडे, अॅड.कारभारी गवळी प्रयत्नशील आहेत.
अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या स्थापनेला दोनशे वर्षे झाले त्याचे औचित्य साधून हा कार्यक्रम लवकरच शिर्डी येथे होणार आहे.लीगल सर्व्हिसेस ॲक्ट १९८७ मधील देश, राज्य आणि जिल्हा पातळीवरील कायदा सेवा प्राधिकरणाचा वापर भारतीय संविधानातील कलम ५१ (अ) खालील मुलभूत कर्तव्याच्या प्रचार व प्रसारामध्ये देशाभरातील वकीलांना सहभागी करावा हा यामागील मुख्य उद्देश आहे. देशभरातील नागरिकांनी आणि सरकारने मुलभूत कर्तव्याबाबत अजिबात मागे राहू नये यासाठीची ही प्रचार मोहीम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.भारताच्या सरन्यायाधीशांसह न्या.भुषण गवई,न्या. अभय ओक,न्या.प्रसन्ना वराळे यांना देखील या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे.नुकतेच अमरावती येथे बदली होऊन जाणारे अहमदनगरचे प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लागड्डा यांनी वकिलांच्या या संपूर्ण कार्यक्रमाला पाठिंबा दिला आहे.
शिर्डी संस्थानच्या अध्यक्ष म्हणून नव्याने रूजू होणा ऱ्या अहमदनगरच्या प्रधान जिल्हा न्यायाधीशांची मदत व्हावी,यासाठी प्रयत्न होणार आहे.देशभरातील मोठ्या संख्येने वकील या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी वकील बांधवांचे प्रयत्न सुरु आहे.ग्लोबल वार्मिंगच्या विरूद्ध वकील,न्यायाधीश आणि तमाम जनतेला सहभागी करून घेण्यासाठी शिर्डी येथे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड व इतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश यांच्या हस्ते पृथ्वीमातेला हरित जिवंत राखी बांधून वृक्षाबंधन केला जाणार आहे.लवकरच या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी वकीलांचे शिष्टमंडळ सरन्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.