कचरा व्यवस्थापन करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची ग्रामपंचायतींना भेट

0

कचरा समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतींनी कायमस्वरूपी उपाययोजना करा -मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

ठाणे – ठाणे जिल्ह्यातील शहरालगत व हायवेलगतच्या ग्रामपंचायती मधील घनकचरा व्यवस्थापनाबाबत ठाणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. भिवंडी, कल्याण, शहापूर, अंबरनाथ तालुक्यातील डंपिंग ग्राऊंड, घनकचरा प्रकल्प, हायवेलगतच्या ग्रामपंचायती या ठिकाणी भेट देऊन संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यात आले.

ठाणे ग्रामीण भागात कचऱ्याची समस्या मोठी आहे. कचऱ्याच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा. ग्रामपंचायती अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्याचे विविध प्रकारे विल्हेवाट करणे तसेच कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामस्थांनी देखील पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले.

भिवंडी तालुक्यातील हायवे लगतच्या दिवे अंजुर, मानकोली, वडपे, पडघा आणि कोण या ग्रामपंचायतींना भेट देऊन तेथील घनकचरा व्यवस्थापनाबाबत व डम्पिंग ग्राउंड येथे प्रत्यक्षात भेटी दिल्या. ग्रामपंचायत अंतर्गत कायमस्वरूपी घनकचरा व्यवस्थापन करणे बाबत सक्त सूचना यावेळी देण्यात आल्या.

शहापूर तालुक्यातील बोर शेती, वाफे आणि चेअरपोली ग्रामपंचायत भेट देऊन तेथील डम्पिंग ग्राउंडला भेट दिली. शहरालगत आणि हायवे लगतच्या ग्रामपंचायतीं मधील घनकचरा व्यवस्थापनाबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करणे बाबतही उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांच्यासमवेत चर्चा करण्यात आली. शहापूर तालुक्यातील दहिगाव येथील जेएसडब्ल्यू अंतर्गत कार्यरत असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास देखील भेट देऊन तेथील प्रकल्पाची पाहणी करण्यात आली.‌ यावेळी प्रकल्प संचालक अतुल पारस्कर, भिवंडी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे, विस्तार अधिकारी उप अभियंता रमेश सासे तसेच अमृत इंटरप्राईजेस संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप ग्रामपंचायतींना भेटी देण्यात आल्या. म्हारळ ग्रामपंचायत येथील नाला सेतू ट्रीटमेंट प्लांट येतील काम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.‌ वरप ग्रामपंचायत अंतर्गत तात्काळ कचरा संकलन केंद्र उभारणीसाठी नियोजन करण्यात यावे अशा सूचना गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांना देण्यात आल्या.

तसेच अंबरनाथ तालुक्यातील ग्रामपंचायत नेवाळी व उसाटणे येथे भेट देण्यात आली. उसाटणे येथील कचरा व्यवस्थापन केंद्राला भेट देऊन कामकाज वेळेत पूर्ण करावे असे आदेश देण्यात आले. ग्रामपंचायत नेवाळी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नेवाळी नाका येते प्रत्यक्ष पाहणी करून हायवे लगत कचरा टाकण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सक्त सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या.

हायवे लगत कचरा टाकणाऱ्या ग्रामस्थांसाठी, शहरा लगत व हायवे मार्गे प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये कचरा संकलन केंद्र उभारावे जेणेकरून कचरा अस्तव्यस्त न पडता एकत्रित जमा करता येईल. कचऱ्यावर पुढील प्रक्रिया व व्यवस्थापन करणे सुलभ होईल असे मार्गदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech