छगन भुजबळ यांना महायुतीसोबत केलेल्या गद्दारीचे फळ मिळाले – सुहास कांदे

0

नागपूर :  अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळांनी कितीही आगपाखड करावी, ढोंग करावे, पण ते राजीनामा देणार नाहीत. ते पक्ष सोडून जाणार नाहीत. माझे त्यांना आव्हान आहे ते खरच ओरिजनल भुजबळ असतील तर त्यांनी पक्षाचा आणि पदाचा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला पुन्हा उभे राहावे असे शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे म्हणाले. फक्त छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले म्हणजे ते ओबीसी समाजाला दिले, असे होते का? छगन भुजबळ म्हणजेच ओबीसी समाज का? छगन भुजबळांच्या या मक्तेदारीविरोधात तक्रार करणारा पहिला व्यक्ती म्हणजे सुहास कांदे आहे. छगन भुजबळ यांनी दिंडोरी आणि नाशिक लोकसभेत काम केले नाही, याचे पुरावे आम्ही वरिष्ठांना दिले. त्यामुळेच भुजबळांना मंत्रिपद मिळाले नाही, हे मी आवर्जून सांगेन. छगन भुजबळ यांना महायुतीसोबत केलेल्या गद्दारीचे फळ मिळाले आहे.

ते पुढे म्हणाले की, मला छगन भुजबळ यांची कीव येते. मी एकदा छगन भुजबळ साहेबांना बोललो होतो की, साहेब तुम्ही दिसायला सुंदर असता तर तुम्ही चांगले अभिनेते झाले असते. पण दुर्दैवाने ते दिसायला चांगले नाहीत म्हणून ते अभिनेते झाले नाहीत. भुजबळ समर्थकांनी अजितदादांच्या प्रतिमेला जोडे मारले, त्यांच्याविरोधात नको-नको ते बोलले. अजित पवार हे छगन भुजबळांना भेटायला नाशिकमध्ये येणार या बातम्या भुजबळांच्या जवळ असणाऱ्या नाशिकमधील पत्रकारांनी पेरल्या आहेत. अजितदादांनी छगन भुजबळ यांना फोन केलेला नाही. ते भुजबळांना फोन करणार नाहीत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech