रत्नागिरी : खासगी शाळांमधील शिक्षकांना आता पोलिसांकडील चारित्र्य प्रमाणपत्र शाळेत सादर करणे अत्यावश्यक आहे. राज्यात मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शाळांमधील मुली व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बदलापूरसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने आता कडक पावले उचलली आहेत. खासगी शाळांमध्ये नव्याने रुजू होण्यापूर्वी शिक्षक तसेच अन्य कर्मचाऱ्यांना आता पोलिसांकडून चारित्र्य प्रमाणपत्र घेऊन ते शाळेत जोडावे लागणार आहे. त्यानंतरच नोकरीत रुजू होता येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने शाळांमध्ये शिक्षक, मदतनीस, लिपिक तसेच अन्य कामांसाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. मात्र काही संस्थाचालक कर्मचाऱ्यांची कोणतीही पडताळणी न करता अशा कर्मचाऱ्यांची नेमणूक करतात. शाळांमध्ये नवीन शिक्षक अथवा कर्मचारी नेमताना पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेतल्याशिवाय नोकरीत समावून घेता येणार नसल्याचे शासनाने जारी केलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात चारित्र्य प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच काही नवीन उपाययोजना लागू करण्याबाबत शासन निर्णय जारी झाले असून रत्नागिरी जिल्ह्यात या निर्णयाची माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाकडून अंमलबजावणी करण्याबाबतच्या सूचना सर्व माध्यमांच्या शाळा व्यवस्थापनांना दिल्या आहेत.