मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथील उद्धव ठाकरे गटाच्या ५० प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला खा. डॉ. भागवत कराड, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, प्रदेश सचिव किरण पाटील, नवनाथ पडळकर, संभाजीनगर भाजपा जिल्हाध्यक्ष संजय खंबायते आदी उपस्थित होते. हिंदुत्व, देशाच्या तसेच राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भाजपा मध्ये प्रवेश केलेल्या सर्वांचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी स्वागत केले. भाजपामध्ये प्रवेश केलेल्या उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये माजी सरपंच, उप शहर प्रमुख, युवा सेना आणि महिला आघाडीच्या पदाधिका-यांचा समावेश आहे.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले की, हिंदुत्वाला सोडचिठ्ठी देऊन उबाठा शिवसेनेने काँग्रेसची विचारधारा स्विकारल्याने हिंदुत्ववादी पदाधिका-यांची घुसमट होत होती. या घुसमटीमुळेच या पदाधिका-यांनी उबाठाची साथ सोडत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी हे कार्यकर्ते भाजपाला साथ देत आहेत. या पक्ष प्रवेशामुळे संभाजीनगर मध्ये भाजपाची ताकद अधिक वाढणार आहे. प्रवेश केलेल्या सर्वांचा पक्षात यथोचित सन्मान राखला जाईल अशी ग्वाही देत नजिकच्या काळात आणिकही अनेक जण भाजपामध्ये येणार आहेत असे बावनकुळे यांनी नमूद केले.
भाजपामध्ये प्रवेश केलेल्या पदाधिका-यांमध्ये माजी सरपंच, उबाठाचे तालुका समन्वयक सचिन कल्याणराव गरड पाटील, उपशहर प्रमुख बिबन सय्यद, किशोर खांड्रे, विभाग प्रमुख सुरेश जगताप, नवनाथ मनाळ, शाखाप्रमुख तुषार ठवळे, विश्वजीत पोळे, महिला आघाडीच्या कमलाबाई गरड, लताताई माळी, तसेच युवा सेनेचे तालुका प्रमुख विजय सरकटे, तालुका अधिकारी प्रशांत पाथ्रीकर, उप तालुका अधिकारी सुरज वाघ, शहर प्रमुख प्रणव तवले, विभाग प्रमुख निखील फरताळे यांसह अनेकांचा समावेश आहे.