नवी दिल्ली – चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत दुसऱ्या वार्षिक भारतीय लष्करी वारसा महोत्सवाचे (आयएमएचएफ) उद्घाटन झाले. 8 व 9 नोव्हेंबर असे दोन दिवस हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. जागतिक व भारतीय विचारवंत, महामंडळे, सरकारी व खाजगी आस्थापना, सेवा संस्था, शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधक यांना एकत्र आणून भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण, लष्कराचा इतिहास तसेच लष्कराचा वारसा या मुद्द्यांवर विचारविनिमय घडवून आणणे हे या महोत्सवाचे उद्दीष्ट आहे.
भारताला प्रदीर्घ व समृद्ध लष्करी वारसा आणि धोरणात्मक संस्कृती असूनही, सर्वसामान्य लोकांना देशाचा लष्करी वारसा व सुरक्षाविषयक चिंता याबाबतचे विविध पैलू माहिती नसतात. देशाविषयीची ही माहिती व देशाची सांस्कृतिक दिनदर्शिका यातील ही दरी सांधणे, हा या महोत्सवाचा उद्देश आहे. भारताच्या लष्करी परंपरा, सुरक्षा व धोरणविषयक सद्यकालिन मुद्दे समजून घेणे आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमांच्या माध्यमातून लष्करी सामर्थ्याबाबत स्वावलंबी होण्यासाठीच्या प्रयत्नांना बळकटी देणे हे या महोत्सवाचे ध्येय आहे.
लष्करी व्यवहार विभाग व यूएसआय यांनी संयुक्तरित्या सुरू केलेल्या ‘शौर्य गाथा’ या प्रकल्पाचे उद्घाटनही यावेळी त्यांच्या हस्ते झाले. भारतीय लष्कराचा वारसा सांगणाऱ्या गोष्टी शिक्षण आणि पर्यटनाद्वारे जतन करून, त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम यूएसआय ही संस्था करते. लष्कर या विषयावरील उल्लेखनीय लेखांचे प्रकाशनही जनरल चौहान यांच्या हस्ते झाले. दिल्ली राजधानी क्षेत्रातले राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) छात्र या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या महोत्सवात लष्कराच्या तिनही दलांची व युवा पिढीला यामध्ये उपलब्ध असलेल्या संधींविषयी माहिती देणारी दालने उभारण्यात आली आहेत.