पुणे : राज्यभरातील शाळांमध्ये गेल्या काही वर्षात विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षे संबंधित घटनांमध्ये वाढ झाली आहे. महापालिकेच्या शहरात सुमारे ३०० शाळा असून त्यामध्ये जवळपास सव्वा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पुणे महापालिका शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या ३०० शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत, त्यात पहिल्या टप्प्यात मुलींच्या ८० शाळेत ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असून त्यासाठी ३ कोटी ७९ लाख रुपये महापालिकेच्या एस्टीमेंट कमिटीत मान्यता देण्यात आली आहे. शहरातील जुन्या हद्दीसह महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावांमधील काही शाळांचाही यात समावेश आहे.
विद्युत विभाग आणि शिक्षण विभागाने एकत्रितपणे सर्व शाळांचे सर्वेक्षण केले. शाळेच्या इमारतीमध्ये किती खोल्या आहेत, किती मजले आहेत, मोकळी जागा, प्रवेशद्वार किती आहेत याची पाहणी केली. त्यानुसार या सर्व इमारतींमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी तब्बल १७ कोटी रुपयांचा खर्च येणार होता. मात्र, महापालिकेच्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद नसल्याने पहिल्या टप्प्यात या कामासाठी शिक्षण विभागास वर्गीकरणाद्वारे ३ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या निधीतून मुलींच्या ८० शाळांमध्ये हे सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत तर उर्वरीत शाळांसाठी २०२४-२५च्या अंदाजपत्रकात स्वतंत्र तरतूद केली जाणार आहे. असल्याची माहिती विद्युत विभागाच्या प्रमुख मनिषा शेकटकर यांनी दिली.