मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्क मैदान प्रचार सभांना मिळावे, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी बीएमसीकडे अर्ज केले आहेत. एप्रिल आणि मे सभांसाठी मैदानाची मागणी राजकीय पक्षांनी केली आहे. १७ मे रोजी उद्धव ठाकरे आणि मनसेच्या राज ठाकरेंच्या सभेसाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळाव्यासाठीही अर्ज दाखल झाला आहे.
यातील अर्ज केलेल्या प्रत्येक पक्षाला परवानगी मिळेलच, असे नाही. शिवाजी पार्कवर सभेसाठी परवानगी देण्यासाठी नियम, अटी आणि दिवस या सगळ््यांचा विचार करून परवानगी दिली जाते. एकाच तारखेला जर दोन पक्षांनी अर्ज केले असतील तर ज्या पक्षाने पहिल्यांदा अर्ज केला आहे, त्या पक्षाला परवानगी दिली जाते. या सभांसाठी शिंदे गटाच्या शिवसेनेने सर्वाधिक अर्ज केले आहेत. यासोबतच भाजपकडून २३, २६ आणि २८ एप्रिल रोजी हे मैदान मिळावे, म्हणून अर्ज करण्यात आला आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडूनही २२, २४ आणि २७ एप्रिल रोजी शिवाजी पार्क सभांसाठी मिळावे, म्हणून अर्ज करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने शिवाजी पार्क येथे सभा घेण्यासाठी तिन्ही पक्षांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त वेळा महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला शिवाजी पार्कचे मैदान उपलब्ध होणार आहे.