मलिकार्जून खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधींसह प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा:  चेन्नीथला

0

*मविआच्या अधिकृत उमेदवाराविरोधातील काँग्रेस बंडखोर ६ वर्षांसाठी निलंबित,कुठेही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही.

*काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंच्या प्रमुख उपस्थितीत १० नोव्हेंबरला महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार.

मुंबई – वांद्रे-कुर्ला संकुलातील महाराष्ट्र स्वाभिमान सभेतून लोकसेवेची पंचसूत्री जाहीर करून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या झंझावाती प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लेकसभेतील विरोधी पक्ष नेते राहिल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते राज्याच्या विविध भागांत काँग्रेस व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत.

आज टिळक भवन येथे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष खा. चंद्रकांत हंडोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेसच्या प्रचार समितीची बैठक पार पडली. या बैठकीला प्रचार समितीचे संयोजक प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्यासह प्रचार समितीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना चेन्नीथला म्हणाले की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हे पाच दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून १३, १४, १६, १७ व १८ नोव्हेंबरला राज्यातील विविध भागात त्यांच्या सभा होतील. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे १२, १४ व १६ नोव्हेंबर रोजी प्रचार सभा घेणार आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी या १३, १६ व १७ नोव्हेंबरला प्रचार सभांना संबोधित करणार आहेत. तेलंगणा व कर्नाटकचे मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे देशभरातील वरिष्ठ नेतेही प्रचारात उतरणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात काँग्रेसच्या ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत त्या सर्व बंडखोरांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना ६ वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. राज्यात कुठेही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले. वांद्रे कुर्ला संकुलात झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेत लोकसेवेची पंचसुत्री जाहीर केलेली आहे, त्याचा घरोघरी जाऊन प्रचार केला जाईल. १० नोव्हेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल ग्रँड हयात मध्ये महाविकास आघाडीचा जाहिरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत हे उपस्थित असतील.

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या गॅरंटी सरकार येताच लागू केल्या जातील. भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेसच्या गॅरंटीविरोधात चुकीच्या व अफवा पसरवणाऱ्या खोट्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. अनेक वर्तमानपत्रात ही जाहिरात कोणी दिली त्याचे नाव नाही. याविरोधात काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने ज्या गॅरंटी दिल्या त्याची अंमलबजावणी सुरु आहे पण भाजपा जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवत आहे. महालक्ष्मी योजनेसह सर्व गॅरंटी जाहिर करताना त्याचा अभ्यास केला असून आर्थिक तरतूद कशी केली जाईल यावर सखोल चर्चा करुनच त्या जाहीर केल्या आहेत, असेही रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला, प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी मंत्री सुरेश शेट्टी, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, सोशल मीडिया विभागाचे प्रमुख विशाल मुत्तेमवार, एसएसी विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे आदी उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech