राज्य सरकारच्या चहा-पानावर मविआचा बहिष्कार

0

नागपूर  : राज्यात महायुतीचे सरकार आणि विदर्भातील मुख्यमंत्री बनल्यामुळे सरकारच्या पहिलेच अधिवेशन अतिशय कमी कालावधीचे आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते जितेंद्र आव्हाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू, महेश सावंत, ज. मो.अभ्यंकर हे उपस्थित होते. बैठकीनंतर महाविकास आघडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेला संबोधीत केले. अल्पावधीच्या या अधिवेशनामुळे जनतेचा अपेक्षाभंग झाल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. तसेच सरकारतर्फे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहा-पानावर बहिष्कार टाकत असल्याचे त्यांनी जाहीर केले. नागपुरातील रवि भवन परिसरात आयोजित महाविकास आघाडीच्या (मविआ) पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते.

याप्रसंगी वडेट्टीवार म्हणाले की, एकीकडे शेतकरी आत्महत्या होत आहे, सोयाबीन, धान कापसाला हमीभाव मिळत नाही. विदर्भात खूप मोठे प्रश्न आहेत, पण त्याला या सरकारने हरताळ फासला आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात संविधानाची विटंबना झाली. यानंतर आंबेडकरी जनतेने आंदोलने केले पण त्यातही कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. अनेक कार्यकर्त्याना मारहाण झाली, धरपकड करण्यात आली. त्यातही एक कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, हे संतापजनक असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. बीड मध्ये एका सरपंचाचे अपहरण करून त्याची निर्घृणरित्या हत्या करण्यात आली. ह्यातील आरोपीला राजकीय वरदहस्त आहे. खून करणाऱ्या आरोपीला राजकीय आश्रय देणारे आज मंत्री केले जाते, त्यामुळे या खुनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड, उबाठाचे प्रतोद सुनील प्रभू, आमदार महेश सावंत, आमदार ज. मो. अभ्यंकर उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech