सोलापूर : निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था आहे. मात्र, त्या संस्थेने विधानसभा निवडणुकीत भाजपचे काम केल्याचा आरोप खा. प्रणिती शिंदे यांनी केला आहे. तसेच सर्व निवडणुका या पारदर्शक झाल्या पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. खा. शिंदे यांनी काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर कडाडून टीका केली. यावेळी माजीमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक विनोद भोसले, गणेश डोंगरे, भीमाशंकर टेकाळे, सुमन जाधव आदी उपस्थित होते. खा. शिंदे म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जे वातावरण होते. तेच वातावरण विधानसभा निवडणुकीत होते. आयबी रिपोर्ट आणि मीडिया सर्व्हे महाविकास आघाडीच्या बाजूने दाखवित असताना महायुतीचे दोनशेपेक्षा जास्त आमदार कसे निवडून येतात, असा सवाल खा. शिंदे यांनी केला.